Latest

सांगली : करमाळे चोरीप्रकरणी आंतरराज्य टोळी जेरबंद

backup backup

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : करमाळे (ता. शिराळा) येथील इंडस टॉवरच्या महागड्या 36 बॅटरी सेल व बिऊर येथील विद्युत मोटारीच्या चोरीप्रकरणी शिराळा पोलिसांनी उत्तर प्रदेश व ओरिसातील सात जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक केली. त्यांच्याकडून 36 बॅटरी सेल, विद्युत मोटार, चारचाकी, मोबाईल व चोरीसाठी वापरलेली अवजारे, असा 8 लाख 82 हजार 594 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 19 जुलेैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

दयाशंकर नंदकुमार निषाद (वय 38, रा. रेंगणा), रामसरण रामआचरे (वय 31, रा. रेंगणा मजरे चांदपूर, दोघे सध्या रा. शिराळा), रामनारायण सुखलाल निषाद (वय 39, रा. कोरवल धौरहरा), विश्वंबर रामलखन निषाद (वय 29, रा. गजईपूर बारा), हुकुमचंद श्रीरामदीन निषाद (सर्व रा. रेंगणा, ता. बिंदकी, जि. फतेहपूर), देसराज जियालाल निषाद (वय 45, महाता, ता. बागुआ, जि. फतेहपूर, सर्व उत्तरप्रदेश), संतोष उर्फ कमलकांत निरंजन नायर (वय 37, बिरजपूर, ता. गुबूडा, जि. गोंजाम, ओरिसा), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अमोल शामराव माळी (वय 35, रेडिएंट फॅसिलिटीज प्रा.लि.पुणे, मूळ रा. भडकंबे, ता. वाळवा) यांनी इंटस टॉवरच्या 36 बॅरटी सेल व बिऊर येथील संजय बाळकू पाटील यांनी विद्युत मोटार चोरीप्रकरणी अज्ञाताविरोधात शिराळा पोलिस ठाण्यात 16 जुलैरोजी फिर्याद दिली होती. त्यांचा तपास हवालदार राजेंद्र माने यांच्याकडे होता. शनिवारी रात्री पोलिस पथक बिऊरच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना उत्तर प्रदेश पासिंग असलेली मोटार (यू.पी.16 ए.के.6856) ही पंक्‍चर झालेल्या अवस्थेत उभी असल्याची आढळून आली. पोलिसांनी यावेळी चौकशी केली असता संशयितांनी उडवाउडवी उत्तरे दिली. गाडी तपासली असता बॅटरी सेल व चोरीसाठीची अवजारे पोलिसांना आढळली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्‍त केला.

पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार, पोलिस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी पाटील, नितीन यादव, माणिक पाटील, शरद यादव, यांनी ही कारवाई केली.

SCROLL FOR NEXT