Latest

सांगली : औषधी ऑईल पुरवठा व्यवहारात दोन कोटी रुपयांची फसवणूक

अमृता चौगुले

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : औषधी ऑईल पुरवठा व्यवहारात दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. औषधासाठी उपयुक्त ऑईलचा पुरवठा करण्याच्या व्यवहारात एकाची दोन कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

याप्रकरणी लंडनस्थित एका कंपनीसह तिघांवर तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अनिल विश्वासराव पाटील (वय 57, रा. येळावी) यांनी फिर्याद दिली आहे.

नेचर फार्मा कंपनी लिमिटेड केंब्रिज, लंडन, मोनासिंग व अनशिका गुप्ता (रा. कलकत्ता, पश्चिम बंगाल) अशी गुन्हा नोंद झाल्यांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गोर्सिनिया कंबोजिया ऑईल हे औषध निर्मितीसाठी वापरले जाते.

तसे फिर्यादी पाटील यांना नेचर फार्मा कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले होते. हे ऑईल संशयित मोनासिंग व अनशिका गुप्ता याच्याकडून खरेदी करा,असे पाटील यांना सुचविले होते. हे औषधी ऑईल मोनासिंग व अनशिका गुप्ता याच्याकडून दीड लाख रुपये प्रतिलिटर या दराने अनिल पाटील यांनी खरेदी केल्यास अडीच लाख रुपये प्रति लिटर दराने नेचर फार्मा कंपनी खरेदी करेल, असे आश्वासन नेचर फार्मा कंपनीने दिले होते.

या औषध खरेदी विक्रीत मोठा नफा मिळेल असे आमिष अनिल पाटील यांना दाखविल्याने पाटील यांनी सात महिन्यापूर्वी शंभर लिटर ऑइल खरेदीची ऑर्डर मोनासिंग याना दिली. त्यासाठी पाटील यांनी स्वतःच्या बँक खात्यातुन मोनासिग आणि आनशिका गुप्ता याना वेळोवेळी दोन कोटी रुपये त्याच्या बँक खात्यावर वर्ग केले. त्यानंतर पाटील यांनी खरेदी केलेले शंभर लिटर ऑईल सात महिन्यांपूर्वी पाटील यांना मिळाले आहे.

गेले सात महिने पाटील हे नेचर फार्मा कंपनीशी खरेदी केलेले ऑईल ठरल्याप्रमाणे घ्यावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. याबाबत कंपनीकडून टाळाटाळ केली जात होती.

गेल्या काही दिवसांपासून नेचर फार्मा कंपनीशी सम्पर्क होऊ शकत नाही. कंपनीची बेबसाईट गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने कंपनीशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने पाटील यांनी तासगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

SCROLL FOR NEXT