Latest

सांगली : एक ग्रॅम सोन्याची अंगठी मागितली म्हणून प्रियकरानं प्रेयसीचा गळा आवळला

अमृता चौगुले

कडेगाव (सांगली); पुढारी वृत्तसेवा : भिकवडी खुर्द येथे अनैतिक संबंधातून प्रियकराने गळा आवळून विवाहितेचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ताई सचिन निकम (रा. बलवडी ता. खानापूर वय 32 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर संशयित आरोपी राहुल सर्जेराव पवार (वय 31 वर्षे रा. सावरकरनगर, विटा ता. खानापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला कडेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

संशयिताने ओढणीने गळा आवळून खून करून मृतदेह येरळा नदीच्या पात्रात फेकून दिला होता. याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 6 जून रोजी भिकवडी खुर्द गावाचे हद्दीत येरळा नदी पात्रात पुलाजवळ एका बेवारस महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांनी पाहणी केली असता मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. सदरचा मृतदेह कोणाचा आहे, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला होता.

चंद्रकांत करांडे व पोलिस अंमलदार उदय देशमुख यांनी सन 2022 चे मिसिंग रजिस्टरची पाहणी करुन बेवारस मिसिंगबाबत माहिती घेतली. त्यावेळी खानापूर तालुक्यातील बलवडी येथील ताई सचिन निकम ही महिला बेपत्ता असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिच्या मृतदेहाची ओळख पटवून दिली होती.

त्यानंतर सदर मयत महिलेचा पती व नातेवाईक यांच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. मयत ताई निकम ही विटा येथे भाड्याच्या घरात राहत होती व येथील हॉटेलमध्ये भाकरी, चपाती करण्याचे काम करत होती. याबाबत पोलिसांनी गोपनियरीत्या माहिती घेतली असता विटा येथील रेणुका ज्वेलर्सचा मालक राहुल पवार याचे मयत ताई सचिन निकम हिच्याशी अनैतिक संबंध असल्याबाबत माहिती मिळाली. मयत ताई निकम व राहुल पवार यांचे एकमेकांना मोठ्या प्रमाणात फोन कॉल झाल्याचे दिसून आले. यावरुन राहुल सर्जेराव पवार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सुमारे दीड वर्षापासून ताई सचिन निकम हिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले.

3 मे रोजी ताई निकम ही राहुलच्या दुकानात आली होती. तिने राहुलकडे तिच्या वाढदिवासाकरिता एक ग्रॅम सोन्याची अंगठी मागितली होती. मात्र राहुलने यास नकार दिला होता. अंगठी न दिल्याच्या कारणावरून तिने प्रेम संबंधाबाबत त्याच्या वडिलांना सांगेन असा दम दिल्याचे राहुलने सांगितले.

त्यानंतर 5 मे रोजी राहूल पवार याने ताई निकमला घेऊन कडेगाव, सैदापूर, शामगाव घाट, चोराडे फाटा मार्गे विट्याकडे येत होता. ढाणेवाडी गावच्या हददीत डांबरी रोडच्या कडेला राहुलने आपली चारचाकी गाडी थांबवली. प्रेमसंबंधाबाबत वडिलांना सांगेन, अशी धमकी देत असल्याच्या कारणावरून त्याने गाडीतच ताई निकमच्या गळ्यातील ओढणीनेच तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गाडीतून भिकवडी खुर्द गावाच्या हद्दीत येरळा नदी पात्रात पुलावरुन टाकून दिल्याचे राहुलने सांगितले.

याबाबत राहुल पवार याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात कडेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार उदय देशमुख, हरीदास पवार, चंद्रकांत करांडे, मिनीनाथ माने, जोतीराम पवार, शिवाजी माळी, संपत जाधव, नवनाथ रावताळे यांनी तपास केला.

SCROLL FOR NEXT