Latest

सर्व भारतीय हिंदूच, डीएनए एकच : मोहन भागवत

मोहन कारंडे

पणजी; पुढारी वृत्तसेवा : चाळीस हजार वर्षांपासून सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. आमच्या पूजापद्धती, राहणीमान वेगवेगळ्या असल्या तरी आम्ही सगळे जण हिंदू आहोत, भारतीय आहोत आणि त्यामुळेच आम्ही प्रत्येक जण हिंदुराष्ट्राचे सदस्य बनतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी येथे केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणावरही 'रिमोट कंट्रोल' म्हणून काम करत नाही. त्याची आवश्यकताही संघाला वाटत नाही, असेही ते म्हणाले. कांपाल येथील बांदोडकर मैदानावर आयोजित महासांघिकमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय सेवक संघाचे प्रांत संघचालक यशवंत चांदेकर व राज्य संचालक राजेंद्र भोबे उपस्थित होते.

भागवत म्हणाले, भारत उन्नत्तीच्या मार्गावर आहे. विश्वगुरू होण्याचा मार्ग भारताने पकडला आहे. हा क्षण अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर आला आहे. आपण सर्वजण एक आहोत, ही भावना जागृत ठेवून देशाप्रती नि:स्वार्थपणे काम केल्यास देश विश्वगुरू निश्चित बनेल. भागवत म्हणाले, भारताने अनेक वर्षे गुलामी अनुभवली. समाज जागृत व एकत्र नसल्याने ते घडले. पुन्हा देश गुलाम होऊ नये यासाठी संघाचे काम गेली साठ वर्षे सुरू आहे. समाजाला परिवर्तन करणारा कार्यकर्ता देशभर उभा करण्याचे काम संघ करत आहे. हाच विचार डॉ.हेडगेवार यांनी देशाला दिला. समाज संघटित करण्याचे कार्य त्यांनी सुरू केले.

भागवत म्हणाले, भारतातील प्रत्येक जण आपले आहेत आपले वेगळे वैशिष्ट्य असले तरी विविधतेतील एकता मान्य करून कार्य करणारा संघ कार्यकर्ता, सकारात्मकता स्वीकारून नकारात्मकता त्यागून सर्वांच्या आकांशा मनात धरून सदभावना जागृत करण्याचे काम प्रत्येक भारतीयाने तथा स्वयंसेवकांने करणे गरजेचे आहे. आम्हाला कुणीच धक्का देणार नाही, एवढे सक्षम प्रत्येकाने होण्याची गरज असून पर्यावरण रक्षणासह संस्कृती व परंपरांचे रक्षण करणे सर्वांचे काम आहे. तसे केल्यासच देश मोठा होईल. भारताला सर्वगुणसंपन्न आणि बलशाली करण्यासाठी सर्वांनी भेदाभेद विसरून राष्ट्रहित कार्याचा वेग वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी महासांघिक सारख्या उपक्रमांची गरज आहे.

भागवत म्हणाले, देशाला विश्वगुरू बनवण्याचे श्रेय हे एका व्यक्तीला नव्हे तर समाजाला मिळावे यासाठी समाजातील प्रत्येकाने निस्वार्थपणे काम करावे व समाज घडवावा. प्रत्येकाने चांगले काम करावे, चांगले काम करणारे कार्यकर्ते घडवणे हे संघाचे काम आहे. असे आम्ही मानतो. भारत दबावाखाली जाता कामा नये यासाठी आम्ही दक्ष आहोत.सर्वानी दक्ष राहावे. ते म्हणाले, सर्वांचे शाश्वत सुख संघाला अपेक्षित आहे भौतिक सुखांमध्ये साधने प्राप्त झाली, मात्र त्यामुळे सुख वाढले नाही तर दुःख वाढले पर्यावरणावर संकटे उभी राहिली, आत्महत्या वाढल्या, कुटुंबे उध्वस्त होऊ लागलीत. कारण आपण सगळ्यांनी साधनांचा उपयोग नको त्या गोष्टीसाठी करणे सुरू केले आहे. हे सर्व टाळण्याची शिकवण संघाच्या माध्यमातून दिली जात असल्याचे सांगून भारत मोठा व्हावा ही आजची गरज आहे.ती जगाची गरज आहे. आम्हाला प्रतिष्ठा हवी, सुरक्षा हवी तर मग देशालाही प्रतिष्ठित आणि सुरक्षित करणे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. सर्वगुणसंपन्न सुखी देशाचा विचार करणारा समाज घडणे गरजेचे आहे. कारण समाजच चांगले नेतृत्व, नेते तयार करतो आणि तेच नेते देशाचे हित साधू शकतात असे संघ मानतो. अर्वाचीन काळात प्रगती करणार्‍या देशांचा अभ्यास केला तर समाजाला उभे करण्याचा प्रयत्न झाल्याचे दृष्टीस पडते मध्यंतरी ही प्रक्रिया बंद झाली आणि हल्लोखोरांचे फावले. आमच्या देशातील अनेक राजा-महाराजा मध्ये एकता नसल्यामुळे अनेक मूठभर आक्रमकांनी आमच्यावर राज्य केले. इंग्रजा पूर्वीपासून अनेकांनी आमच्यावर अत्याचार केल, कारण आम्ही देशाला एकसंघ करणारा समाज त्याकाळी उभा राहिला नाही. विभागला गेला. हीच विभागणी पुन्हा होऊ नये अशी संघाची भूमिका आहे.

ते म्हणाले, प्रत्येकाने देशाला मातृभूमी तथा आपली माता म्हणून निस्वार्थीपणे सेवा करावी. ही संघाची अपेक्षा आहे. देशात राहणार्‍या प्रत्येकाने एकच मनात ठेवावे अन ते म्हणजे देशप्रेम, हेशहित. हीच शिकवण संघ देतो. आपले कार्य पाहून इतरांनी आपले कार्य पाहून प्रेरित व्हावे असे कार्य प्रत्येकाने करावे असे संघाला वाटते. पहिले राष्ट्र, नंतर राज्य, नंतर पक्ष, नंतर पद आणि कुटुंब असी संंघाची धारणा आहे सारी विविधता एकता आहे.आम्ही सर्व या मातीचे पुत्र आहोत, हिंदू आहोत हे सर्वानी समजून घ्यावे. कारण चाळीस हजार वर्षापासून आम्हा सर्वांचा डीएनए एकच आहे. काहींचे पूजा राहणीमान वेगवेगळी असले तरी हम सब एक है ही भावना प्रत्येकाने मनी धरायला हवी.

ते म्हणाले, आपले वेगळे वैशिष्ट्य असले तरी भारत को जानो, भारत को मानो आणि भारत के बणो असे संघ सांगतो. सकारात्मकता मनामध्ये ठेवून नकारात्मक दूर करून त्यागी जीवन जगा. आम्हाला कोणी धक्का पोहोवणार नाही एवढे सक्षम व्हा. सत्तापद प्राप्तीसाठी समाजसेवा करू नका. स्वतंत्र सैनिक हुतात्म्यांनी सत्तेसाठी, पदासाठी लढाई नाही लढली. हे लक्षात घ्या.

संघात या संघ समजेल

संघ काही देत नाही मात्र देशसेवा करवून घेतो. संघात बाहेर राहून संघ समजणार नाही. संघामध्ये जो येईल त्याला संघ समजेल संघाच्या बाहेर राहून टीका करणे सोपे मात्र संघामध्ये आल्यानंतरच संघाचे निस्वार्थी कार्य पाहून सर्व किल्मिषे दूर होतात. म्हणून सर्वांनी संघांमध्ये यावे असे आवाहन याप्रसंगी डॉ. भागवत यांनी केले .संघाच्या कवायती पाहून अनेकांना संघ हा पॅरामेडिकल फोर्स आहे की काय वाटतो, संघाची गाणी ऐकून अनेकांना ही संगीत शाळा आहे असे वाटते मात्र संघात आल्यानंतरच त्याचे महत्त्व कळते. संघ देशहितासाठी सर्वाना प्रेरित करून सर्वाना सोबत घेऊन चालणारी प्रक्रिया आहे . देशाला संघटित करण्याचा प्रयत्न संघाचा आहे. पूर्ण समाजाला एकशक्ती करून भारताला सामर्थ्यवान करण्याचे संघाचे प्रयत्न असल्याचे मोहन भागवत म्हणाले.

कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. संघाचे स्वयंसेवत शिस्तीत बसले होते. डॉ. भागवत यांनी सुमारे पंचावन्न मिनिटे उपस्थितांना मार्गदर्शन केले. संघाच्या कवायती केल्या. मोठ्या संख्येने राज्यभरातून स्वयंसेवक व हितचिंतक उपस्थित राहिले होते.

अनेक नेते गणवेशात

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर, आमदार संकल्प आमोणकर व दाजी साळकर हे नेते संघाच्या गणवेशात आज या कार्यक्रमात सहभागी झाले होते. विश्वजित राणे, संकल्प आमोणकर, जीत आरोलकर, चंद्रकांत शेट्ये यांनी पहिल्यांदाच संघाचा गणवेश चढवला होता,त्यामुळे त्यांची बरीच चर्चा झाली. विश्वजित राणे, संकल्प आमोणकर यांनी आम्ही यापूर्वी संघाच्या शाखेत जात होतो, असा दावा केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT