Latest

सरकारी शाळांमधील सूर्यनमस्कार कार्यक्रमावर मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध

Arun Patil

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील ३० हजार सरकारी शाळांमध्ये १ ते ७ जानेवारी दरम्यान सूर्यनमस्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने या आदेशाला मात्र विरोध दर्शवला आहे. शाळांमध्ये असे कार्यक्रम घेऊ नयेत, अशी मागणीही बोर्डाच्या वतीने करीत मुस्लीम मुला-मुलींनी सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारत एक धर्मनिरपेक्ष, बहुधार्मिक आणि बहु-सांस्कृतिक देश आहे. यावर आधारितच आपली राज्यघटना लिहिण्यात आली आहे. कोणत्याही सरकारी शिक्षण संस्थेमध्ये धर्माबाबत शिक्षण द्यायला किंवा कोणत्या एका विशेष समूहाच्या मान्यतेच्या आधारावर कार्यक्रमाचे आयोजन करायला, आपली राज्यघटना परवानगी देत नाही.

सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करणे दुर्दैवी घटना असून, सध्याचे सरकार राज्यघटनेच्या मूळ उद्देशापासून भटकत आहे, अशी टीका ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे महासचिव हजरत मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी केली आहे.

सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करणे हे घटनाविरोधी कृत्य आहे. देशप्रेमाचा खोटा प्रचार आहे. सूर्यनमस्कार हा सूर्याच्या पूजेचा एक प्रकार आहे. मुस्लीम किंवा इतर अल्पसंख्याक ना सूर्याला देव मानतात ना त्याची उपासना, पूजा करतात. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घेत धर्मनिरपेक्षता मूल्याचा सन्मान करावा, असे आवाहन केले आहे.

शिवाय देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी राष्ट्रगीत म्हणावे, असे आवाहन केले आहे. देशातील वाढती बेरोजगारी, महागाई, रुपयाचे अवमूल्यन,देशाच्या सीमेचे रक्षण याकडे सरकारने लक्ष द्यावे, असे आवाहनही रहमानी यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT