Latest

संशोधन : नव्या युगाची चाहूल?

Arun Patil

अवकाशात आपलं बाळ जन्माला घालण्याची कल्पना रोमांचक आहे. त्यामुळंच आतापर्यंत 10 लाख लोकांनी नावं नोंदवली आहेत. मात्र, त्यामध्ये कोणताही धोका नाही, हे पूर्णपणे सिद्ध झाल्यानंतरच असं बाळ जन्माला यावं, असंच संशोधक म्हणतात ते रास्तच आहे.

एक गोष्ट नक्की की, हा लेख वाचणार्‍या प्रत्येक वाचकाच्या गावात 'ते' आहे. अर्थात, गाव अगदीच छोटं असलं तर लगतच्या मोठ्या गावात, तालुक्याच्या ठिकाणी, शहारात तरी 'ते' नकीच आहे. 'ते' म्हणजे आयव्हीएफ सेंटर. (इन व्हायट्रो फर्टिलायझेशन सेंटर – टेस्टट्यूब बेबी सेंटर) प्रसूतिगृह असणं ही प्रत्येक गावाची गरज असतेच; पण आताच्या काळात फक्त प्रसूतिगृह असणं पुरेसं ठरत नाही. आयव्हीएफ सेंटर असणंही आता गरजेचं झालं आहे. याला कारणं अनेक आहेत; पण मुख्य कारणं दोन. एक म्हणजे, मुला-मुलींची लग्नं उशिरा होणं आणि दुसरं म्हणजे लग्न झाल्यानंतरसुद्धा मूल होणं लांबणीवर टाकणं. वयाची तिशीच काय; पण पस्तिशी ओलांडल्यानंतर आपल्याला आता बाळ हवं, असा विचार सुरू झाला की, बहुतेकांना आयव्हीएफ सेंटरची मदत घ्यावी लागते. जी गोष्ट निसर्ग सहजपणे घडवून आणतो, त्याच गोष्टीसाठी 'शरीरबाह्य फलन तंत्रा'ची मदत घेणं अनेकांच्या बाबतीत आता अपरिहार्य झालं आहे.

हेच तंत्र वापरून अवकाशात माणसाचं बाळ जन्माला घालता येईल का, याद़ृष्टीनं आता विचार सुरू झाला आहे. 'स्पेसबॉर्न युनायटेड'च्या सहकार्यानं ब्रिटनमधील संशोधक असा प्रयोग करणार असल्याची बातमी तुम्ही गेल्या आठवड्यात वाचली असेल. अशारीतीनं अंतराळात माणसाचं बाळ जन्माला घालण्याची गरज वाटण्याचं कारण असं की, आता माणूस, आपल्या पृथ्वीचा चंद्र आणि दूरच्या अंतरावर असणारा मंगळ यावर वसाहती करण्याचं स्वप्न पाहू लागला आहे. तिथं वसाहत करायची, तर तिथं माणसाच्या नवीन पिढ्या जन्माला आल्या पाहिजेत; पण दोन्ही ठिकाणी मुख्य अडचण आहे, ती गुरुत्वाकर्षणशक्तीची! दोन्ही ठिकाणी पृथ्वीपेक्षा खूपच कमी गुरुत्वाकर्षण आहे. कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या ठिकाणी अवकाशवीरांचा रक्तदाबही कमी होतो. त्यामुळं लैंगिक संबंधांसाठी आवश्यक ती शरीरावस्था साधणंही, विशेषतः पुरुषाला अवघड असतं. परिणामी, कमी गुरुत्वाकर्षणशक्तीच्या ठिकाणी स्त्रीबीज आणि पुंबीज यांचं यशस्वीरीत्या मीलन होणं खूपच अवघड आहे. या अडचणीवर कशी मात करता येईल, याचा विचार गेली काही वर्षं सुरू आहे. यासंदर्भात काही प्राण्यांवर प्रयोग करण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांना अंतराळात पाठवण्यात आलं आणि तिथं त्यांचं मीलन होऊन मादी गर्भार राहू शकते काय, याची पाहणी करण्यात आली. हा प्रयोग उंदरांवर करण्यात आला. परंतु, कोणतीही मादी गर्भार राहिली नाही; मग अंतराळात उंदरांचं शरीरबाह्य फलन करण्याचा प्रयोग करण्यात आला. तोसुद्धा यशस्वी झाला नाही; मग उंदराचा भ्रूण (एम्ब्रिओ) अंतराळात पाठविण्यात आला आणि तो व्यवस्थित वाढतो काय, याची पाहणी करण्यात आली; पण अवकाशात उंदराचा भ्रूण अपेक्षेप्रमाणं वाढत नसल्याचंच दिसून आलं.

यानंतर प्राण्यांचे शुक्राणू आणि त्यांचे भ्रूण यांच्यावर कमी गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास रशियाच्या मीर या अवकाश केंद्रावर करण्यात आला. तेव्हा कमी गुरुत्वाकर्षणाचा अनिष्ट परिणाम या सर्वांवर होत असल्याचं स्पष्ट झालं. या सर्व प्रयोगांतून संशोधकांच्या असं ध्यानात आलं की, प्राण्याला अंतराळात बाळ होणं कठीणच आहे; मग आता काय करायचं? प्रश्न कठीण आहे, म्हणून तो सोडून द्यायचा, असं संशोधक करत नाहीत. उलट प्रश्न जितका अवघड तितकेच अधिक कठोर प्रयत्न ते करतात. हाती घेतलेल्या प्रश्नाचा विविधांगांनी विचार करतात. आपली बुद्धी, प्रतिभा, कल्पकता, चिकाटी यांना अथक श्रमाची जोड देतात आणि त्या कठीण प्रश्नाचं उत्तर शोधतात. आजवर विज्ञानाची जी प्रगती झाली आहे, तिच्यामागं हेच तर रहस्य आहे. आताही संशोधकांनी तेच केलं. अवकाशात गोठवलेले (फ्रिज्ड) शुक्राणू आणि भ्रूण पाठवले तर त्यातून काही साध्य होईल काय, असा विचार ते करू लागले. या विचारामागे काही निश्चित असे फायदे होते. एक तर माणसाला अवकाशात पाठवण्यासाठी लागते, त्यापेक्षाही खूपच कमी जागा गोठवलेले शुक्राणू आणि भ्रूण अवकाशात नेण्यासाठी पुरणार होती. दुसरं असं की, ते त्याच अवस्थेत प्रदीर्घकाळ ठेवता येणं शक्य असतं, ही मोठीच जमेची गोष्ट होती.

असे गोठवलेले शुक्राणू आणि भ्रुण अपेक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना त्या अवस्थेतून सामान्य स्थितीला आणणं आणि त्यांचं आरोपण गर्भाशयात करणं तुलनेनं सोपं जाणार होतं. अर्थात, अवकाश प्रवासाच्या दरम्यान वैश्विक किरणोत्साराचं संकट कायमच असणार आहे. त्या किरणोत्साराचा गोठवलेल्या शुक्राणूंवर आणि भ्रूणांवर काय आणि किती परिणाम होईल, याची धास्ती संशोधकांना वाटत होतीच. ती दूर करण्यासाठी सन 2017 मध्ये एक प्रयोग करण्यात आला. त्यामध्ये उंदराचे गोठवलेले शुक्राणू रशियाच्या अवकाश केंद्रावर पाठवण्यात आले. तिथं 10 महिने ते ठेवले गेल्यानंतर ते परत पृथ्वीवर आणले गेले. त्यानंतर त्यांची तुलना त्याच उंदराच्या ताज्या शुक्राणूंबरोबर करण्यात आली. त्या तुलनात्मक अभ्यासात असं दिसून आलं की, 10 महिने अवकाश केंद्रावर ठेवण्यात आलेल्या गोठवलेल्या शुक्राणूंच्या डीएनएमध्ये काही बदल झाले आहेत. हे शुक्राणू वापरले तर गर्भपाताचा धोका आहेच; पण समजा नवीन 'नर-पिल्लू' जन्माला आलं तर ते नपुंसक असण्याची संभाव्यता खूप मोठी आहे. हे धोके लक्षात घेऊनसुद्धा संशोधकांनी पृथ्वीवर परत आणलेल्या शुक्राणूंचा आयव्हीएफ तंत्रामध्ये वापर केला. तेव्हा या शुक्राणूंमुळं उंदराच्या मादीचं बीज फलित झालं आणि नवीन भ्रूण तयार झाले! हे भ्रूण उंदराच्या मादीच्या गर्भाशयात आरोपित करण्यात आले. यथावकाश त्या मादीला पिल्लं झाली आणि ती अगदी सर्वसाधारण पिल्लांसारखीच आहेत, असं संशोधकांच्या ध्यानात आलं. साहजिकच, संशोधकांचा हुरूप वाढला. त्यांनी मानवी शुक्राणू आणि भ्रूण यांच्यावर कमी गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो, ते पाहण्याचे निश्चित केलं.

अर्थात, असं करणं हे अनैतिक आहे, अशी भूमिका काही जणांनी घेतली. परंतु, मंगळासारख्या ग्रहावर किंवा त्याही पल्याडच्या ग्रहावर माणसाला जाऊन तिथं आपली वसाहत उभी करायची असेल, तर कमी गुरुत्वाकर्षणाचा मानवी शुक्राणूंवर आणि भ्रूणावर काय, किती आणि कसा परिणाम होतो, हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे, असं मत बहुसंख्य संशोधकांनी व्यक्त केलं. त्यानुसार एक प्रयोग केला गेला. मानवी शुक्राणूंवर कमी गुरुत्वाकर्षणाचा होणारा परिणाम आजमावून पाहण्यासाठी त्यांनी मानवी शुक्राणूंचे 10 नमुने अवकाशात पाठवले. त्यासाठी अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी जे विमान वापरलं जातं, त्याच विमानाचा उपयोग करून घेण्यात आला.

अवकाशात काही काळ 'राहून' परत आलेल्या या शुक्राणूंची नंतर तपासणी करण्यात आली. पुनरुत्पादन क्षमतेची चाचणी घेणार्‍या कोणत्याही केंद्रात माणसाच्या शुक्राणूंची जशी तपासणी करण्यात येते, तशीच अवकाशात मुक्काम करून आलेल्या शुक्राणूंची करण्यात आली. तेव्हा अवकाशात कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या अवस्थेत राहिलेल्या शुक्राणूंवर कोणताही अनिष्ट परिणाम झाला नसल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं. तपासणीतून पुढं आलेला हा निष्कर्ष संशोधकांना आनंद देणारा आणि यासंदर्भात पुढचं पाऊल उचलण्यास प्रेरक ठरणाराच होता.
अर्थात, या प्रयोगानं सर्व आलबेल आहे, असल्याचं आपल्याला सांगितलेलं नाही.

पृथ्वीचा चंद्र किंवा मंगळ यावर जाण्यासाठी लागणारा काळ लक्षात घेतला, तर अधिक प्रयोग करण्याची आवश्यकता आहे, हे संशोधकांना माहीत आहे. म्हणूनच तर 'स्पेसबॉर्न युनायटेड'सुद्धा अगोदर उंदरांवरच प्रयोग करणार आहे. त्यासाठी'जैविक उपग्रह' (बायो-सॅटेलाईट) अवकाशात पाठविले जातील. या उपग्रहांमध्ये पृथ्वीवर असते तशी आणि तितकीच गुरुत्वाकर्षण शक्ती आणि भ्रूणाच्या वाढीला पोषक असं वातावरण असणार आहे. या वर्षाच्या अखेरीस हा प्रयोग केला जाईल, असं आता तरी सांगितलं जात आहे. त्या प्रयोगांतून काय दिसतं यावरच त्यांना पुढचा निर्णय घेता येणार आहे. अवकाशात आपलं बाळ जन्माला घालण्याची कल्पना रोमांचकच आहे. त्यामुळंच आतापर्यंत 10 लाख लोकांनी नावं नोंदवली आहेत. मात्र, त्यामध्ये कोणताही धोका नाही, हे पूर्णपणे सिद्ध झाल्यानंतरच असं बाळ जन्माला यावं, असंच संशोधक म्हणतात. ते रास्तच आहे.

शरीरबाह्य फलन तंत्राचा वापर करून पहिली टेस्टट्यूब बेबी 1978 सालामध्ये जन्माला आली. तिचं नाव लुईसी ब्राऊन! त्यानंतरच्या गेल्या 44 वर्षांत याच तंत्राचा वापर करून जगात आजवर जवळपास 80 लाखांहून अधिक बाळं जन्माला आली. या बाळांनी अनेकांच्या आयुष्यात सुखाचं आणि समाधानाचं वारं आणलं. निराशेच्या गर्तेत कोसळलेल्या जोडप्यांच्या संसारात आनंदाची बाग फुलवली. आता एकविसाव्या शतकात याच तंत्राचा वापर करून अंतराळातच बाळ जन्माला घालण्याचं स्वप्न माणूस बघत आहे. सतत नवीन स्वप्नांच्या मागे धावणार्‍या, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अहर्निश धडपडणार्‍या माणसाला याही प्रयोगात यश मिळेल, अंतराळात माणसाचं बाळ जन्माला येणं पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही मिळेल आणि एका नव्या युगाची सुरुवात होईल, अशी आशा करूया.

श्रीराम शिधये

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT