Latest

संभाजी राजे यांना शिवसेना प्रवेशासाठी सोमवारपर्यंत मुदत

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेच्या उमेदवारीसाठी छत्रपती संभाजी राजे यांना शिवसेना प्रवेशाची अट घालतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे. संभाजी राजे आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांना राज्यसभेची चौथ्यांदा उमेदवारी शिवसेनेने दिली असून, राऊत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील. शनिवारी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उभयतांममध्ये राज्यसभा निवडणुकीविषयी चर्चा झाली. त्यानंतर राऊत यांनी सांगितले की, संभाजी राजे हे आम्हालाही प्रिय आहेत, पण त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून राज्यसभेची निवडणूक लढवावी आणि तसे सोमवारपर्यंत त्यांनी कळवावे, असा प्रस्ताव शिवसेनेने त्यांना दिला आहेे.

संभाजी राजे हे छत्रपतींच्या घराण्यातील असून त्यांचा सन्मान व्हावा ही आमची इच्छा आहे. परंतु त्यांनी अपक्ष निवडणूक न लढवता शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, असेही राऊत म्हणाले.

भाजपचा राजेंना पाठिंबा विशेष म्हणजे मराठा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी संभाजी राजे यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा, अशी मागणी संजय राऊत यांची भेट घेऊन केली. त्यावर राऊत यांनी कोणतेही भाष्य केले नाही. दरम्यान, संभाजी राजे अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार असतील तर त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू, असे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र एकट्या भाजपच्या पाठिंब्यावर संभाजी राजे निवडून येणे शक्य नाही. त्यासाठी त्यांना शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज लागेल.

महाविकास आघाडीत मागील वेळी राष्ट्रवादीला एक जागा अधिक दिली होती. त्यामुळे आता सहावी जागा ही शिवसेनेची आहे. संभाजी राजे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढण्यास नकार दिला तर लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ या माजी खासदारांची नावे या जागेसाठी चर्चेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT