Latest

संजय राऊत हे शरद पवार यांच्या गळ्यातील ताईत ; दीपक केसरकर

अमृता चौगुले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :   जे कधीही जनतेतून निवडून आले नाहीत, असे संजय राऊत हे शरद पवार यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. ते पक्ष संपवायला निघाले आहेत, असा आरोप शिवसेनेतील बंडखोर गटाते प्रवक्‍ते आमदार दीपक केसरकर यांनी सोमवारी केला. संजय राऊत यांचे ऐकून पक्ष चालणार असेल, आमच्यासारख्या अनेकवेळा जनतेतून निवडून येणार्‍या आमदारांना दूर ढकलले जाणार असेल तर करायचे तरी काय, असा सवालही त्यांनी केला आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या केसरकर यांचे एक पत्र सोमवारी शिंदे गटाकडून प्रकाशित करण्यात आले. या पत्रात केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि आमच्यात दरी वाढविण्याचे पाप संजय राऊत यांनी केले आहे. 2014 ची लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजपने एकत्र लढवली. विधानसभा निवडणूकसुद्धा एकत्र लढण्याचे ठरले होते. मात्र युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मिशन 151 प्लस अशी घोषणा केली.

वाटाघाटी केल्यानंतर भाजप 127 आणि शिवसेना 147 जागा असे सूत्र निश्‍चित झाले होते. मात्र, शिवसेनेकडून चार जागांचा आग्रह काही सोडण्यात आला नाही. शेवटी जे व्हायला नको होते ते झाले आणि दीर्घकाळाची युती तुटली, अशी खंतही केसरकर यांनी पत्रात व्यक्‍त केली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा युती झाल्यानंतर संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका करण्याचा विषारी क्रम प्रारंभ केला. केंद्रात मोदींच्या मंत्रिमंडळात राहायचे, राज्यातील सरकारमध्ये घटक पक्ष म्हणूनही सामील व्हायचे आणि मोदींवर जहरी टीका करायची यातून दोन पक्षांतील दरी वाढविण्याचे काम पद्धतशीरपणे करण्यात आले, असे त्यांनी म्हटले आहे.

तुम्हीच बंडखोरी करून शिवसेना आणि महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप राष्ट्रवादीने शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्यावर केला आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, दीपक केसरकर यांना राष्ट्रवादीत असताना सन्मानाची वागणूक आणि जबाबदारी देण्यात आली होती. हे त्यांनी लक्षात ठेवावे. महाराष्ट्रात मोदी सरकार विरोधात ज्यांनी आवाज उठवला, त्या सर्वांच्या मागे ईडी लावण्याचे काम कोणी केले याचे उत्तर केसरकर यांनी द्यावे, असे आव्हान तपासे यांनी दिले आहे.

SCROLL FOR NEXT