Latest

संजय राऊत : ‘विक्रांत’चा पैसा पीएमसी बँकेतून चलनात!

Arun Patil

नवी दिल्ली/मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आयएनएस विक्रांत प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्या यांनी काही वर्षांपूर्वी निधी जमा केला होता. त्या निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

सोमय्या यांच्या नीलमनगरमधील कार्यालयात आयएनएस विक्रांतसाठी जमा झालेला पैसा एकत्र करण्यात आला. त्यानंतर तेथून तो वितरीत करण्यात आला, तसेच पीएमसी बँकेत या काळ्या पैशाला व्हाईट करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला. हा पैसा सोमय्या यांनी निवडणुकीत वापरला.

पीएमसी बँकेतून हा पैसा व्हाईट करीत चलनात आणण्यात आले आणि नील किरीट सोमय्यांच्या व्यवसायात उपयोगात आणण्यात आले, असा आरोपदेखील राऊत यांनी केला. पैसा जमा करण्यासाठी 711 मोठे बॉक्सेस तयार करण्यात आले होते. हा सगळा प्रकार मनी लाँडरिंगचा असू शकतो. ईडी ही केंद्रीय संस्था भाजपची बटीक नसेल तर या प्रकरणी सोमय्यांवर कारवाई करतील, असा टोलाही राऊत यांनी हाणला. या प्रकरणाचे पुरावे मागितले जात आहेत. परंतु, गोळा करण्यात आलेल्या पैशांचा व्यवहार अगोदर दाखवा. त्यानंतर पुरावे देईन, असे आव्हानही राऊत यांच्याकडून देण्यात आले आहे.

सोमय्या यांनी देशासाठी बलिदान करणार्‍यांच्या अपमान केला असून त्यांची कृती देशद्रोहीपणाची आहे. परंतु, देशभक्‍तीचे गीत गाणारे, देशभक्‍तीचा दाखला देणारे देवेंद्र फडणवीस यांनी देशद्रोहीपणा करणार्‍यांची बाजू घेतली.

फडणवीस यांच्या या पवित्र्याने स्वर्गीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, रज्जूभैया, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आत्मा तीळ तीळ तुटत असेल. मोहन भागवत यांनादेखील वाईट वाटत असेल, असेही राऊत यांनी म्हणाले. आयएनएस विक्रांतच्या या भ्रष्टाचाराची व्याप्‍ती मोठी आहे. देशभरातून पैसे जमा केले. आयएनएस विक्रांतसाठी ठरवण्यात आलेल्या 200 कोटींपेक्षाही अधिक पैसे जमा झाले असल्याचा दावा राऊत यांनी केला.

भाजप नेत्यांचे मुखवटे गळून पडले

कधी गंगाजल, कधी राम मंदिराच्या नावाखाली पैसे जमा करण्यात आले असल्याचे राऊत यांनी सांगितले. देशाचा स्वाभिमान असणार्‍या आयएनएस विक्रांतच्या नावाखाली निधी जमवला आणि गैरव्यवहार केला. देशभक्‍ती, हिंदुत्वाचे मुखवटे लावून लोकांना मूर्ख बनवणार्‍या भाजप नेत्यांचे मुखवटे गळून पडले असून आता भविष्यात असे आणखी घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा राऊत यांनी दिला.

'सेव्ह विक्रांत'च्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा देशभरात गाजणार. शिवसेनेने राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला. महाराष्ट्रात या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन होणार आहे. आम्ही स्वस्थ बसणार नाही.

सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल

आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली निधी गोळा करून या रकमेचा अपहार केल्याप्रकरणातील तक्रारीवरून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह त्यांचे पुत्र नगरसेवक नील यांच्यावरही ट्रॉम्बे पोलिसांनी भादंवि कलम 406, 420, 34 अन्वये बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. माजी सैनिक बबन भोसले (53) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जनतेकडून जमवलेला निधी राज्यपालांच्या सचिवांकडे जमा झालेला नाही, अशी माहिती माहिती अधिकाराअंतर्गत देण्यात आल्याचे कार्यकर्ते धीरेंद्र उपाध्याय यांनी उघडकीस आणली होती. त्यानंतर भोसले यांनी तक्रार दाखल केली.

SCROLL FOR NEXT