Latest

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये बनला बर्फाचा ताजमहाल

अमृता चौगुले

श्रीनगर :  जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा बहरला आहे आणि त्यामुळे स्थानिक लोक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नव्या नव्या गोष्टीही करीत आहेत. तेथील इग्लू कॅफेने अलीकडेच लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. बर्फापासून बनवलेल्या या इग्लूची अनेक छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. आता तिथे ताजमहालचीही अशीच बर्फापासून प्रतिकृती बनवण्यात आली आहे.

गुलमर्ग हे काश्मिरी ठिकाण तेथील स्की-रिसॉर्टसाठी प्रसिद्ध आहे. सुंदर बर्फाच्छादीत टेकड्यांवरून स्किईंगचा खेळ खेळण्यासाठी जगभरातील पर्यटक तिथे जात असतात. आता याच ठिकाणी ही बर्फापासून बनवलेली ताजमहालची प्रतिकृती लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. एका खासगी रिसॉर्टमध्ये ही प्रतिकृती बनवली असून रिसॉर्टच्याच चार कर्मचार्‍यांनी ती तयार केली आहे.

12 अंश सेल्सिअस तापमान असताना सतरा दिवसांच्या काळात ही प्रतिकृती बनवण्यात आली. हा बर्फाचा ताजमहाल 24 फूट बाय 24 फूट आकाराचा असून त्याची उंची 16 फूट आहे. येथे आलेल्या पाहुण्यांना काश्मिरी कहावा म्हणजेच चहा दिला जातो. याठिकाणी खास सेल्फी पॉईंटही आहेत. हा ताजमहाल पाहण्यासाठी कोणतेही शुल्क नाही व तो चोवीस तास खुला असतो. रात्रीच्या वेळी तिथे खास रोषणाई केलेली असते.

SCROLL FOR NEXT