मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आफताब मुसलमान होता म्हणून श्रद्धाच्या वडिलांचा तिच्या लग्नाला विरोध होता; पण श्रद्धाची आई गंभीररीत्या आजारी पडल्यानंतर आपल्या डोळ्यांदेखत लेकीचे लग्न व्हावे, ही या माऊलीची अखेरची इच्छा पुढ्यात आली. श्रद्धाचे वडील म्हणतात, मग मी हतबल झालो आणि ज्या बापाला हे लग्न नको होते, तोच बाप आफताबच्या दारावर मागणी घालायला गेला. पण आफताबचा लहान भाऊ असद याने त्यांना दारातूनच अपमानित करून परत पाठविले…
श्रद्धा हत्याकांड हा सध्या देशभरात चर्चेचा विषय आहे. या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर श्रद्धा वालकर आहे. आता (श्रद्धाचे खून प्रकरण) वडील विकास वालकर हे इच्छा नसतानाही श्रद्धा व आफताबच्या लग्नासाठी तयार झाले होते. अखेरची इच्छा अपूर्णच राहिली आणि श्रद्धाची आजारी आई मरण पावली. पुढे आफताब कुटुंबासह वसईतून बेपत्ता झाला. विकास वालकर यांना शंका आली. श्रद्धासोबत काहीतरी विपरीत घडल्याची धाकधूक झाली.
आफताबचे कुटुंब २० वर्षांपासून वसईत राहात होते. मात्र ११ नोव्हेंबर रोजी श्रद्धाची हत्या उघडकीला येण्यापूर्वी दोन आठवड्यांआधीच ते वसईतून बेपत्ता होते. आफताबनेच त्यांना वसईतून बिन्हाड हलविण्यास सांगितले होते. आफताबच्या कुटुंबाने शेजाऱ्यापाजाऱ्यांना धाकटा मुलगा असदच्या नोकरीचे काम झाल्याने आम्ही वसई सोडत असल्याचे खोटेच सांगितले होते. आफताबचे वडील अमीन पूनावाला मुंबईच्या कांदिवली- मालाड भागात बुटांचे घाऊक व्यापारी आहेत. मुलाच्या अटकेपासून अमीन पूनावालाही दिल्लीतच आहेत.