Latest

शौचालयासाठी खड्डा खणताना सापडली सोन्याची नाणी

Arun Patil

लखनौ : कुणाला कधी व कसे 'घबाड' मिळेल हे काही सांगता येत नाही. उत्तर प्रदेशात अशीच एक अनोखी घटना घडली आहे. तिथे जौनपूरच्या मछली शहरात शौचालयासाठी खड्डा खोदताना ब्रिटिशकालीन सोन्याची नाणी सापडली. ही नाणी सापडताच खड्डा खोदणार्‍या मजुरांमध्ये नाणी घेण्यावरून वाद निर्माण झाला.

ही सर्व नाणी ब्रिटिश राजवटीतील सन 1889 ते 1912 या काळातील आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाणी जप्त करून तपास सुरू केला. खोदकाम करणार्‍या मजुरांपैकी काहीजण फरार असल्याचे सांगण्यात आले आहे. मछली शहरातील कजियाना परिसरातील नूरजहाँ राईन यांच्या घरात शौचालय बांधण्यासाठी हा खड्डा खोदण्यात येत होता. त्यावेळी तांब्याच्या भांड्यात काही ब्रिटिशकालीन सोन्याची नाणी सापडली.

यासाठी मजुरांमध्ये वाद होता व ही बाब नूरजहाँ यांच्या मुलाला समजताच त्याला एक नाणे देण्यात आले. पोलिसांना ही माहिती समजताच आधी मजुरांनी ताकास तूर लागू दिली नाही; पण नंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी नाणी सापडल्याचे कबूल केले. मजुरांकडून नऊ आणि मालकाकडून एक अशी एकूण दहा नाणी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. एकूण किती नाणी सापडली हे अजून स्पष्ट झाले नसून त्याची चौकशी सुरू आहे.

SCROLL FOR NEXT