Latest

शेतीमाल हमीभावासाठी स्वायत्त कृषी आयोगाची गरज : डॉ. प्रतापसिंह जाधव

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. हमीभावासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धर्तीवर स्वायत्त असा केंद्रीय स्तरावर कृषी आयोग स्थापन झाला पाहिजे. त्यासाठी शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे आणि वैचारिक नांगरट केली पाहिजे, असे मत दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी रविवारी व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या नांगरट साहित्य संमेलनात ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटक रामदास फुटाणे यांनी 'लेखणीचा नांगर झाला पाहिजे', अशी अपेक्षा व्यक्त केली.

पहिले नांगरट साहित्य संमेलन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी भाषा भवनात उभारलेल्या शरद जोशी नगरात पार पडले. यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. आ. ह. साळुंखे आणि वामनराव चटप यांचा 'स्वाभिमानी जीवन गौरव' पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी स्वागताध्यक्ष होते.

शेतकर्‍यांच्या प्रश्नाशी नाळ जुळली

साहित्य म्हणजे उच्च वर्गाची मक्तेदारी नाही. ती बहुजन समाजाने केव्हाच मोडीत काढली आहे, असे सांगून डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले की, अनेक मराठी साहित्य संमेलने होतात. पण शेतकर्‍यांनी भरवलेले हे पहिलेच संमेलन आहे. त्यांनी दिलेला जीवन गौरव पुरस्कार हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण आपण संपादक आणि वकील असलो तरी पहिला शेतकरी आहे. वडिलोपार्जित शेती मीही केली आहे. शेती आणि दूध व्यवसाय परवडत नाही हे मला माझ्या घरातच जाणवले. तेथूनच आमची शेतकर्‍यांच्या प्रश्नाशी नाळ जुळली.

शेतकरी लढ्याचे यश

लढा दिल्याशिवाय आयुष्यात काहीच मिळत नाही, असे सांगून डॉ. जाधव म्हणाले की, ऊस दराच्या बाबतीत राजू शेट्टींनी आंदोलन पुकारले की, सरकारकडून मध्यस्थीसाठी माझ्याकडे विचारणा व्हायची. एकदा तर शेट्टी यांनी बारामतीत आंदोलन केल्यावर शरद पवार यांनी आपल्याला फोन करून या आंदोलनातून मार्ग काढण्याची विनंती केली आणि आपण उभयमान्य तोडगा काढू शकलो. मात्र हे सर्व शेतकरी लढ्याचे यश आहे, असे मी मानतो.

शेतकर्‍यांची वैचारिक नांगरट

एसएमपी परवडत नाही, एफआरपी परवडत नाही, दुधाला योग्य दर मिळत नाही या सर्व प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा आपण करतच असतो. जे समाजाचे हिताचे आहे ते 'स हितेन इति साहित्यम' म्हणजे ज्यात समाजाचे हित असते ते साहित्य असे म्हटले जाते. या साहित्यात आता नांगरट करणार्‍या शेतकर्‍यांची भाषा येईल आणि मराठी साहित्य अधिक समृद्ध होईल, असे सांगून डॉ. जाधव म्हणाले की, या साहित्य संमेलनाने शेतकर्‍यांची वैचारिक नांगरट होईल.

नदीजोड प्रकल्पाची गरज

भारताने 1950 साली 5.2 कोटी मेट्रिक टन धान्याचे उत्पादन केले. आता ते 32.35 मेट्रिक टनावर पोहोचले आहे. शेतकर्‍यांनी समृद्धी दाखवली. मग आत्महत्या का होतात, याचे कारण हमीभाव मिळत नाही हेच आहे. हमीभावासाठी स्वायत्त असा कृषी आयोग स्थापन करावा. कारण आपल्याकडे लहान शेतकरी आहेत. कांदा, टोमॅटोला भाव मिळत नाही म्हणून पिकावर ट्रॅक्टर फिरविण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. हे टाळायचे असेल तर कृषी आयोग आणि नदीजोड प्रकल्प हे त्याचे उत्तर आहे.

शेतकर्‍यांना कर्जमाफीची नाही, तर हमीभावाची गरज

शेतकर्‍यांना कर्जमाफी नको आहे; तर त्यांच्या शेतमालाला हमीभावाची गरज आहे. तो हमीभाव मिळेल तेव्हा कर्जमाफीची गरज राहणार नाही, असे सांगून डॉ. जाधव म्हणाले की, आज आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांनी येथे आपली कला सादर केली. त्यांच्याकडे बघून वाईट वाटते. या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यासाठी राजू शेट्टी यांनी एखादी संस्था उभारावी. दै. 'पुढारी'ने ज्याप्रमाणे सियाचीन या सर्वोच्च रणभूमीवर भारतीय जवानांसाठी हॉस्पिटल उभारले, त्याच धर्तीवर राजू शेट्टी यांच्या संस्थेला मदत देण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. अनेक संस्थांकडे कोट्यवधी रुपयांचा निधी आहे. हा निधी आपण आणू.

जागतिक शेतीचा आढावा घेताना चीन धान्य उत्पादनात एक नंबर आहे. भारत दोन नंबर व अमेरिका तीन नंबरवर आहे. पण भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेती उत्पन्नाचा जीडीपीमधील वाटा भारताचा आहे, असेही डॉ. जाधव म्हणाले.

लेखणीचा नांगर झाला पाहिजे, असे सांगून संमेलनाचे उद्घाटक रामदास फुटाणे म्हणाले की, माझाही शेतीशी संबंध आला. आमच्या शेतात डॉक्टर आणि वकील्या या नावाची दोन बैलं होती. त्यांची अशी नावे का ठेवली हे माहीत नाही. ज्यावेळी ठरावीक मंडळींचे काव्यवाचनाचे कार्यक्रम होत होते, त्यावेळी आपण पुढाकार घेऊन ग्रामीण भागातून अनेक लेखक आणि कवी मुंबईत आणले.

शेतकर्‍यांना तुटपुंजी कर्जमाफी

नांगरट साहित्य संमेलनानंतर शेतकर्‍यांना अधिक माहिती आणि अर्थज्ञान मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून फुटाणे म्हणाले की, उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जे माफ होतात तेव्हा शेतकर्‍यांना कर्जमाफीच्या रूपाने दहा टक्के मिळतात. त्यामुळे 80 टक्के भारत आहे तिथेच आहे आणि 20 टक्के इंडियाची प्रगती होत आहे.

दै. 'पुढारी'ने शेतकर्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्याबद्दल आपण 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे अभिनंदन करतो, असे सांगून फुटाणे म्हणाले की, ईश्वर हा डॉक्टर, नर्स, कामगार अशा अनेक रूपात आहेत. आता शेतकर्‍यांनी तो ईश्वर आपल्यात पाहिला पाहिजे. एका गावात एक हजार शेतकर्‍यांना वर्षाला सहा हजार मिळतात, त्याचवेळी त्या गावात सातव्या वेतन आयोगात कोट्यवधी रुपये चालून येतात. ही विषमता दूर करण्यासाठीच लेखणीचा नांगर होण्याची गरज आहे.

शेतकर्‍यांची वैचारिक बैठक तयार करणार : शेट्टी

स्वागताध्यक्ष या नात्याने राजू शेट्टी यांनी ज्यावेळी आपण विठ्ठल वाघ यांच्या साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी मतदारांनी पाठिंबा द्यावा, अशी भूमिका घेतली त्यावेळी आपल्याला साहित्यात काय कळतं, अशी टीका झाली. मात्र, मोठमोठ्या साहित्यिकांच्या प्रतिमेला ज्यामुळे पंख फुटतात, असे द्रव्य शेतकर्‍यांनी तयार केलेल्या ऊस आणि द्राक्षामुळेच तयार होते. त्यामुळे आता शेतकर्‍यांची वैचारिक बैठक तयार करण्यासाठी नांगरट साहित्य संमेलन दरवर्षी होणार असून तुमची दुकाने आमच्यामुळेच चालली आहेत, असा इशाराही दिला.

सुरुवातीला बैलजोडी व नांगराचे पूजन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांनी दिंडी काढून प्रमुख पाहुण्यांना मिरवणुकीने सभागृहात आणले. 30 जिल्ह्यांतील ही मुले आहेत. त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची व्यथा नृत्य-नाट्य रूपातून सादर केली. 'पाठ जगाला दावू नका, जहर तुम्ही खाऊ नका' या त्यांनी सादर केलेल्या नृत्यनाटिकेने उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी स्वागत केले.

दै. 'पुढारी'च्या माध्यमातून शेतकर्‍यांना ऊस दरवाढीपोटी 32 हजार कोटी

दै. 'पुढारी'ने ऊस आंदोलनाला बळ दिले. ज्या ज्यावेळी ऊस दराचा संघर्ष उभा राहिला, त्यावेळी 'पुढारी'ने अत्यंत आक्रमक व रोखठोक अशी भूमिका घेतल्याचे सांगून डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले की, 'उसाला लागला कोल्हा' या 'पुढारी'च्या लेखमालेतून जी जागृती झाली, त्यामुळे आंदोलन उभे राहिले आणि वाढीव ऊस दरापोटी शेतकर्‍यांचा 32 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला तर 'पांढर्‍या दुधातील काळे बोके' या दूध क्षेत्रातील मक्तेदारीवर प्रहार करणार्‍या 'पुढारी'च्या लेखमालेवर दूध उत्पादकांना 360 कोटी रुपये मिळाले. हे राजू शेट्टी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT