कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचार्यांनी न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या अंतिम टप्प्यातील बेमुदत काम बंद आंदोलन 18 डिसेंबरपासून सुरू केले आहे. आंदोलनामुळे विद्यापीठाचे ( shivaji university ) कामकाज पूर्णतः ठप्प असून, परीक्षांसह प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. कार्यालयात शुकशुकाट होता.
विद्यापीठ ( shivaji university ) व महाविद्यालयीन कृती समितीने विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. विद्यापीठातील सर्व कर्मचार्यांनी शनिवारी सकाळी 10 वाजता मुख्य इमारतीच्या मुख्य दरवाजासमोर जमून घोषणा दिल्या. मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के यांना देण्यात आले. कामकाज बंद असल्याने रोजंदारी सेवक विद्यापीठ परिसरात फिरताना दिसून येत होते. यामुळे विद्यापीठात येणारे विद्यार्थी व पालक यांची गैरसोय झाली.
शासनाने महाविद्यालयीन व विद्यापीठ ( shivaji university ) कर्मचार्यांवर आंदोलन लादले आहे. शासनाने दुजाभावाची वागणूक देऊन अधिकारी व शिक्षक यांना सातवा वेतन लागू केला. मात्र, कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवण्यात आले. विद्यार्थी व पालक यांना वेठीस धरण्याचा कर्मचार्यांचा हेतू नसून हा लढा कर्मचार्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आहे.
आंदोलनात शिवाजी विद्यापीठ ( shivaji university ) कृती समितीतर्फे महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे मिलिंद भोसले, शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे राम तुपे, शशिकांत साळुंखे, विशांत भोसले, सुरेश पाटील, सुनील जाधव, अजय आयरेकर व महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे आनंद खामकर सहभागी झाले होते.