Latest

शिवाजी विद्यापीठ: सर्व दूरस्थ अभ्यासक्रमांना ‘यूजीसी’ची मान्यता

मोनिका क्षीरसागर

कोल्हापूर;पुढारी वृत्तसेवा: शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राकडील सर्व अभ्यासक्रमांना नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांच्याकडून मान्यता मिळाली असून, विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राकडील प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ करण्यात येत असल्याची माहिती केंद्राचे संचालक डॉ. डी. के. मोरे यांनी बुधवारी दिली.

या मान्यतेसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव आणि विद्यापीठाची विविध अधिकार मंडळे यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. यूजीसीकडून मान्यता मिळालेल्या बी.ए., बी.कॉम., एम.ए. भाषा (इंग्रजी, हिंदी, मराठी), एम.ए. सामाजिकशास्त्रे (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र), एम.कॉम., एम.एस्सी. (गणित), एम.बी.ए या पदवी व पदव्युत्तर विषयांची शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असून कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांतील 81 अभ्यास केंद्रांमध्ये विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, सैनिक, उद्योजक, शेतकरी, कामगार व बंदीजन आदी शिक्षणापासून वंचित घटकांना प्रवेश घेता येणार आहे.

विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर Distance Education या लिंकवर प्रवेशाबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. एमबीए अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया यापूर्वीच झालेली असून, त्यामधील पात्र उमेदवारांना प्रवेश देण्याची कार्यवाही लवकरच होत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी स्वतःचा यूजर आयडी व पासवर्ड तयार करून नोंदणी करणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यार्थ्याने निवडलेले अभ्यासकेंद्र हेच शक्यतो परीक्षा केंद्र म्हणून दिले जाते. प्रथम वर्षाचा ऑनलाईन अर्ज नव्याने सादर करताना ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी बँकेची कागदपत्रे (पासबुक, डेबिट/क्रेडिट कार्ड, यूपीआय/ खाते क्रमांक/ आयएफएससी कोड इ.) सोबत ठेवणे गरजेचे आहे. संपूर्ण ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत अभ्यास केंद्रावर जमा करण्याची मुदत शुल्कासह 15 ऑक्टोबरपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी 0231-2609451 व 2609452 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.

विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राची वैशिष्ट्ये

12 प्रोग्राम्सअंतर्गत विविध अभ्यासक्रम / दर्जेदार स्वयंअध्ययन साहित्य उपलब्ध / 2 विभागीय केंद्रे, 81 अभ्यास केंद्रे, दुर्गम भागांचाही
समावेश / अभ्यास केंद्रांमध्ये संपर्कसत्रांचे आयोजन / विद्यार्थ्यांना विषयतज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन / ऑनलाईन व्हिडीओ मार्गदर्शन सत्रांचाही समावेश / विद्यार्थ्यांना नेट/सेट तसेच स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन.

शिवाजी विद्यापीठाचे दूरशिक्षण केंद्र प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी : कुलगुरू

दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या सर्व अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून मान्यता मिळाली असल्याने ज्या व्यक्ती व्यवसाय, नोकरी व अन्य कारणांमुळे प्रवेशापासून वंचित आहेत, अगर काही कारणांनी ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिलेले आहे त्यांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा, असे आवाहन कुलगुरू शिर्के यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT