मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. राज ठाकरे यांची ही भूमिका राज्यातील आगामी महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसाठी आव्हान ठरणार आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक या महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेला घेरण्याची रणनीती मनसेने आखली आहे.
मनसेच्या स्थापनेनंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत मनसेच्या उमेदवारांनी लाखांपेक्षा जास्त मते घेतली. त्यामुळे शिवसेनेचे मुंबईतील तीनही उमेदवारांचा पराभव झाला होता. मराठी मतांचे विभाजन झाल्यामुळे तेव्हा काँग्रेसचे उमदेवार निवडून आले होते.
त्यानंतर सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे मुंबईसह राज्यात 13 आमदार निवडून आले होते. परंतु हा यशाचा आलेख मनसेला चढता ठेवता आला नाही. 2014 ची लोकसभा निवडणूकच मनसेने लढवली नाही. कधी काँग्रेससोबत, कधी दुसर्याच पक्षासोबत अशा बदलत्या भूमिकांमुळे मतदार त्यांच्यापासून दूर गेला. पण आता नव्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांना सूर गवसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप व मनसे यांची युती होण्याची शक्यता धूसर आहे. पण निवडणुकीत काही तडजोडी होतील. त्या भाजप आणि मनसेच्या पथ्यावर पडतील, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.
मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली या महापालिकांसाठी मनसेने रणनीती आखली आहे. शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार बनविणे हे मराठी आणि हिंदुत्ववादी मतदारांना रुचलेले नाही. हा मतदार मनसेकडे झुकेल. मराठी तरुणांच्या रोजगारासाठी राज ठाकरे यांनी तेव्हा घेतलेल्या भूमिकेमुळे मराठी मतदारांनी मनसेला भरभरून मतदान केले होते. 2009 नंतर पुन्हा बारा वर्षांनी मनसेने मराठी मतदारांबरोबर हिंदुत्ववादी मतदारांना आकर्षित करण्याचे मनसेने ठरविले आहे.
उत्तर भारतीय मतदार वगळले तरी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या महापालिकांच्या निवडणुकात मनसेकडे गुजराती, जैन, मारवाडी या समाजाचे मतदार वळू शकतात. मराठीबहुल प्रभागात मनसेला प्राधान्य देण्याची भाजपची खेळी आहे. तेथे या समाजाची मते निर्णायक ठरू शकतील.
पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकमेकांस पूरक ठरू शकतात. त्यामुळे ते महाराष्ट्र विकास आघाडीला आव्हान ठरू शकतात. नाशिकमध्ये मनसे ही शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी आहे. नाशिक महापालिका पुन्हा एकदा जिंकण्यासाठी मनसेची तयारी सुरू आहे.