Latest

शिवसेनेत रंगले आढळराव यांच्या हकालपट्टीचे नाट्य

अमृता चौगुले

मंचर : पुढारी वृत्तसेवा : माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याचे वृत्त शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाले. त्यावर रविवारी चांगलेच नाट्य रंगले. अखेर हकालपट्टीचे वृत्त अनवधानाने प्रसिद्ध झाल्याचा खुलासा पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी केला.

दरम्यान, मंगळवारी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. त्यानंतर यावर भूमिका स्पष्ट करू, असे आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्याचे वृत्त 'सामना'मध्ये रविवारी प्रसिद्ध झाले. त्यानंतर विविध चॅनेल, न्यूज पोर्टलनीही ते प्रसारित केले. त्यानंतर त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर पाटील हे शिवसेनेतच आहेत. त्यांची हकालपट्टी केली नसल्याचा खुलासा शिवसेनेने एका पत्राद्वारे केला.

शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेतच उपनेतेपदावर कार्यरत आहेत, असेही या पत्रात म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, गेली 18 वर्षे पक्षासाठी काम करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष करीत आलो आहे. आपल्यावर कारवाई झाल्याची बातमी वाचून अत्यंत वाईट वाटले. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतरही सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात भूमिका मांडत असल्याने ही वेळ माझ्यावर आली असावी, असा टोला त्यांनी पक्ष नेतृत्वाला लगावला.
एकनाथ शिंदेंच्या

अभिनंदनाची पोस्ट आणि…

शनिवारी रात्री माझे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले होते. मी एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनासाठी केलेली पोस्ट त्यांना आवडली नसल्याचे ते म्हणाले. त्यावर मी नवीन मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाची केवळ पोस्ट केल्याचे सांगितले. त्यावर 'ठीक आहे, झाले ते झाले, या भेटायला', असे ठाकरे यांनी सांगितले होते. सकाळी माझी हकालपट्टी झाल्याचे वृत्त वाचून माझा विश्‍वासच बसेना, असे पाटील म्हणाले.

शरद पवारांनी मला राज्यसभेची 'ऑफर' दिली होती. मात्र मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. शिवसेनेसोबत प्रामाणिक राहिलो ही माझी चूक आहे काय?
– शिवाजीराव आढळराव पाटील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT