Latest

शिवराज्याभिषेक प्रेरणादायी घटना

Shambhuraj Pachindre

डॉ. वसंतराव मोरे

छत्रपती शिवाजी महाराज एक व्यक्ती नसून स्वातंत्र्याचा प्रेरक विचार आहे. शिवरायांनी हिंदू समाजातील मराठा, ब्राह्मण, वैश्य, हरिजन, गिरिजन या सर्वांना एकत्र आणले. त्यांनी अंधश्रद्धा नष्ट करून समाजास वैज्ञानिक द़ृष्टी दिली. शिवरायांनी भारतीय नौदलाची स्थापना केली व स्वत: बेदनूरवर समुद्रमार्गे आक्रमण केले. मध्य पूर्वेत आपली व्यापारी जहाजे पाठवून व्यापार वाढविला. समुद्र उल्लंघन केल्याने हिंदू धर्म बुडतो, ही अंधश्रद्धा नष्ट केली.

जबरदस्तीने कोणास मुसलमान केल्यास त्याला परत हिंदू धर्मात घेता येत नव्हते. शुद्धीबंदी हा नियम मोडून त्यांनी बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर यांना मुस्लिम केले असताना परत हिंदू धर्मात प्रवेश देऊन धर्मक्षय वाचविला. कलियुगात क्षत्रीय नाहीत, ही अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी आपला राज्याभिषेक करणे आवश्यक होते. त्यांनी विजापूर, गोवळकोंडा, मुगल, इंग्रज यांना नमविले व आपले क्षत्रीयत्व सिद्ध केले.

एक अविस्मरणीय घटना :

शिवकालीन बखरकार कृष्णाजी अनंत सभासद लिहितात- 'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मर्‍हाटा पातशहा येवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.' हिंदू समाजाच्या इतिहासातील हा वैभवशाली दिवस आहे. सर्वत्र मुसलमान राजे, हिंदू राजा झाला नाही व होणार नाही, असा न्यूनगंड भेदून हा सोनियाचा दिवस उगवला. गुप्त काळानंतर हा महत्त्वपूर्ण समारंभ झाला. त्याकाळी राजे मोरे, राजे शिर्के, राजे निंबाळकर होते; पण ते मांडलिक राजे होते. सार्वभौम राजे नव्हते. लग्नाशिवाय संसार व्यर्थ ठरतो, तसेच राज्याभिषेकाशिवाय राज्य व्यर्थ ठरते. म्हणूनच त्यांनी शून्यातून 'हिंदवी स्वराज्य' निर्माण केले. राज्याभिषेक केला व धर्मसत्तेची मान्यता प्राप्त केली.

मुगल, इंग्रज, पोर्तुगीज, यवन इत्यादींची धारणा होती की, शिवाजी म्हणजे जहागीरदार शहाजीचा बंडखोर पुत्र. लुटारू. मात्र राज्याभिषेकाने त्यांना राजसत्तेची मान्यता प्राप्त झाली. त्यांच्या करारांना महत्त्व प्राप्त झाले. गोवळकोंड्याच्या कुतूबशहाने त्यांचा सन्मान केला. हिंदूही राजा होऊ शकतो, अशी प्रेरणा भारतीय हिंदू राजांना मिळाली. हा समारंभ म्हणजे भारतवर्षातील यावनी सत्तेच्या अधोगतीचा परिवर्तन बिंदू आहे. यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे यावनी स्वार्‍या बंद होऊन मराठ्यांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे स्वार्‍या प्रारंभ झाल्या व थेट अटकेपर्यंत पोहोचल्या. या ऐतिहासिक महत्त्वपूर्ण घटनेच्या स्मरणार्थ शिवरायांनी 'राज्याभिषेक' शक सुरू केले. मात्र, पेशव्यांनी नादानपणाने ते बंद केले.

ऐतिहासिक महत्त्व :

राज्याभिषेक समारंभाने शिवाजी महाराजांनी सिंहासन निष्ठा निर्माण केली. त्यामुळेच मंत्रिमंडळाने राजाराम महाराजांना छत्रपती करण्याचे योजून संभाजीराजांवर अन्याय केला. त्यावेळी सेनापती हंबीरराव मोहिते यांनी आपले भाचे राजाराम यांना पाठिंबा न देता युवराज संभाजीराजांना छत्रपती केले.

औरंगजेबाच्या आक्रमणावेळी संभाजीराजे, राजाराम व ताराबाई यांनी 27 वर्षे लोकयुद्ध करून औरंगजेब व मुगल साम्राज्याची कबर महाराष्ट्रात केली. हे सिंहासन निष्ठेमुळे घडले.

संपूर्ण भारतात यावनी सत्तेला आव्हान देणारी सार्वभौम मराठा सत्ता निर्माण झाली.

विक्रम संवत, शालिवाहन शक याप्रमाणे 'शिवशक' प्रारंभ न करता 'राज्याभिषेक शक' प्रारंभ केला. त्यामुळे या दुर्मीळ घटनेचे महत्त्व स्पष्ट होते.

हा समारंभ म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची पहाट आहे. यावनी सत्ता उतरतीला लागली आणि युग परिवर्तन झाले.

मराठ्यांच्या भारतभर आक्रमणाने स्थानिक राजांना प्रेरणा मिळाली. त्यांनी विद्रोह केला. म्हणूनच फाळणीच्या वेळी मराठ्यांचे घोडे जिथंपर्यंत दौडले होते, तेवढाच हिंदुस्थान झाला, बाकी पाकिस्तान झाला.

1857 च्या स्वातंत्र्ययुद्धात व स्वातंत्र्यलढ्यात लाल, पाल व बाल इ. यांचे प्रेरणास्थान शिवचरित्र होते. इतकेच नव्हे तर बांगलादेशच्या स्वातंत्र्यवीरांचे व व्हिएतनामच्या स्वातंत्र्यवीरांचे प्रेरणास्थान शिवचरित्रच आहे. या समारंभामुळे शिवचरित्र वैश्विक झाले आहे.
देशातीत, कालातीत व धर्मातीत प्रेरणा देणारे हे शिवचरित्र आहे. याचे विस्मरण झाल्यास महान संकट ओढवेल.

असा झाला सोहळा

  • 11 मे रोजी परशुरामाची पूजा चिपळूण येथे केली.
  • 16 मे रोजी भवानी दर्शनासाठी प्रतापगडावर गेले व सव्वा मण सोन्याची छत्री भवानीस अर्पण केली.
  • 29 मे रोजी गागाभट्टाने महाराजांचे मौजीबंधन केले. तुलादान विधी व प्रायश्चित्त विधी पार पाडले.
  • हयात राण्यांशी पुन्हा वैदिक पद्धतीने विवाह केले.
  • 6 जून 1674, ज्येष्ठ शुद्ध 13, शनिवार, या दिवशी राज्याभिषेक समारंभ संपन्न झाला. शुक्रवारी सायंकाळी प्रारंभ झालेला हा समारंभ शनिवारी सकाळी संपला.
  • 32 मण सोन्याचे हिरे-माणके जडविलेल्या सिंहासनावर महाराज आरूढ झाले. मागे तराजू, मासा व घोड्याची शेपूट या वस्तू प्रतीकरूपाने लावल्या होत्या. तराजू – न्यायी राजा, मासा – सागरावर सत्ता गाजवणारा राजा व घोड्याची शेपूट – घोडदलाचा शक्तिशाली राजा. आठ दिशांना आठ प्रधान, पट्टराणी सोयराबाई, युवराज संभाजी व राजमाता पायरीवर विराजमान होते.
  • मराठ्यांच्या सर्व गडांवर तोफा गरजल्या आणि मराठ्यांचा राजा छत्रपती झाल्याची गर्जना केली.
  • शस्त्रपूजा करून अश्वावर व हत्तीवर बसून गडावरील देवतांचे दर्शन केले. हत्तीचे माहूत म्हणून सेनापती हंबीरराव मोहिते होते व अंबारीमध्ये मोर्चेल धरून मोरोपंत बसले होते.
  • 'बखर'कार सभासद लिहितात, या समारंभास एक करोड बेचाळीस लाख होन (एक होन म्हणजे चार रुपये) खर्च झाले.
  • निश्चलपुरीच्या तांत्रिक गोसावी यांनी सप्टेंबर 1674 ला दुसरा तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT