Latest

शिरोळ, कुरुंदवाड, खिद्रापूर परिसर पाण्याखाली; महापुराची मगरमिठी

अमृता चौगुले

शिरोळ, कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : शिरोळ, कुरुंदवाड, खिद्रापूर परिसर पाण्याखाली गेला असून संपूर्ण तालुक्याला महापुराची मगरमिठी बसली आहे. कृष्णा, वारणा, पंचगंगा या प्रमुख नदीवरील धरणातून पाणी विसर्ग कमी करण्यात आला आहे. तरीदेखील शिरोळ विभागात कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पाणीपातळी तासागणिक वाढत आहे.

पंचगंगा (75), कृष्णा (60.3) नदीने धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. याशिवाय नृसिंहवाडी-शिरोळ मार्गावर चार फूट पाणी आल्याने मार्ग बंद झाला आहे.

स्थलांतरित कुटुंबासाठी गुरुदत्त साखर कारखाना दत्त साखर कारखाना पद्माराजे विद्यालय या ठिकाणी शासकीय निवारा छावण्या उभा करण्यात आल्या आहेत. तर बहुतांशी नागरिकांनी खाजगी भाड्याच्या खोलीत स्थलांतरण केले. ही आकडेवारी सरासरी 45 हजाराच्या आसपास असल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने सांगितले. दरम्यान जावईवाडी, काळे मळा, पाटील मळा, जनता हायस्कूल, राजाराम शाळा, शाहूनगर, मांगारूडी वसाहत शिरटी रोडवरील मळावस्ती भाग, जय शिवराय मंडळ, अजिंक्यतारा मंडळ, धनगर गल्ली, धरणगुत्ती रोड वरील नागरीवस्तीमध्ये पाणी शिरल्याने 900 कुटुंबे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली आहे. कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून बारा तासात अनुक्रमे राजापूर 6, शिरोळ 12.1, तेरवाड 9.6, नृसिंहवाडी 12.9 फुटाने वाढ झाली आहे.

हिप्परगी, अलमट्टीमुळे फुग

प्रमुख चार नद्यांच्या धरणातून सध्या जेमतेम पाणी विसर्ग सुरू, सलग तीन दिवस पाऊस नसताना सुध्दा पाणीपातळीत कमालीची होणारी वाढ होत आहे. राजापूर बंधार्‍यावरून कर्नाटकात होणारा 3 लाख 16 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग आणि हिप्परगी बरोबर अलमट्टीतुन होत असलेला विसर्ग यात तफावत असल्याने, शिरोळ मधील नद्यांच्या पाण्याची पातळी कमी होत नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुरुंदवाडला बेटाचे स्वरुप; कोपेश्वर मंदिरात पाणी

कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत शनिवार रात्री 2 फुटाने वाढल्याने मजरेवाडी रस्ता बंद झाला आहे. सध्या कुरुंदवाड शहराला बेटाचे स्वरूप आले आहे. खिद्रापूर कोपेश्वर मंदिरात पाणी आले आहे. कुरूंदवाड पोलीस ठाणे, एस.टी.आगार, बाजारपेठ यासह शहरात पाणी आल्याने नागरिकांची स्थलांतरासाठी धावपळ उडाली होती. कृष्णा नदीच्या महापूराने खिद्रापूरला वेढा पडला आहे. कोपेश्वर मंदिरात 4 फुट पाणी आले आहे. राजापुरवाडी ग्रामपंचायत वगळता संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आहे. मजरेवाडी-कुरुंदवाड रस्त्यावर पाणी आल्याने कुरुंदवाड शहरातून बाहेर पडण्यासाठीचा एकमेव रस्ता खुला होता. तो रस्ताही रविवारी दुपारी पाण्याखाली गेल्याने शहराला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

शनिवारी मध्यरात्री सुमारास पोलिस ठाण्यात पाणी शिरले आहे. रविवारी महापूराचे पाणी बाजारपेठेच्या दिशेने येत आहे. त्यामुळे कुरूंदवाडमधील अनेक गल्ल्या पाण्याखाली गेल्या आहेत. येथील नागरीकांना एस.के.पाटील व दत्त महाविद्यालयात स्थलांतर करण्यात आले आहे. तर जनावरे महाराणा प्रताप चौकात स्थलांतर करण्यात आली आहेत.

टाकवडेत 51 कुटुंबांचे स्थलांतर

टाकवडे : येथील नागरी वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पूररेषा नियंत्रण कक्षातील येणारे 51 कुटुंबांना मराठी शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित कुटुंबांनी त्यांच्या नातेवाईक व स्वतःहून स्थलांतरित झाले आहेत. इचलकरंजी-टाकवडे, टाकवडे-शिरढोन रस्त्यावरती पुराचे पाणी आले असल्याने रस्ता बंद आहे. दरम्यान आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पूरग्रस्त नागरिकांना भेट देऊन पुर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रकाश पाटील-टाकवडेकर, पी.वाय.पाटील, राजू पाटील, तानाजी झुटाळ, शकुंतला कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

कवठेगुलंदसह सात गावांत धास्ती

कवठेगुलंद : शिरोळ तालुक्यातील कावठेगुलंदसह, आलास, बुबनाळ, औरवाड, गौरवाड, शेडशाळ, गणेशवाडी या गावात पाणी शिरले आहे. शनिवारी सायंकाळ पर्यंत 20 हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतर करण्यात आले आहे. त्याबरोबर तब्बल 4 हजाराहून अधिक जनावरे सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. सात गावांचा तालुकाशी संपर्क तुटलेला आहे. आलास, बुबनाळ , औरवाड, गौरवाड, शेडशाळ, गणेशवाडी या गावात पुराचे पाणी घरात शिरले आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी ठेवण्यासाठी आर्मी, एनडीआरएफ, रेस्क्यूकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

शिरोळकरांची उडाली झोप

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा

शिरोळ तालुक्यात 43 गावांना महापुराचा फटका बसला आहे. आतापर्यंत 52 हजार पेक्षा जास्त पूरग्रस्तांचे स्थलांतर झाले आहे. महापुरामुळे शेतीवाडीसह घरादारे पाण्याखाली गेल्याने पूरग्रस्तांच्या मनात हुरहूर लागली आहे.

कृष्णा, वारणा, पंचगंगा व दुधगंगा या चार नद्यांच्या महापुरामुळे जिल्ह्यात सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसतो. यापुर्वी 2005, 2006 व 2019 मध्ये आलेल्या महापूरामुळे शिरोळ तालुक्यातील 43 गावांतील नागरिकांचे सर्वकाही नद्यांनी आपल्या कवेत घेतले होते. यातील झालेले नुकसान हे अद्याप भरून निघू शकलेले नाही. अशातच कोरोना त्यानंतर आता आलेला महापूर यामुळे 43 गावांतील नागरिकांच्या डोळ्यातील झोप उडाली आहे. शासनाने 10 किलो गहू, तांदूळ व 5 लिटर रॉकेल अशी मदत जाहिर केली असली तरी पुरग्रस्तांचे झालेले नुकसान कसे भरून निघणार? हा खरा प्रश्न आहे.

जिल्हा प्रशासन, लष्करी जवान, एनडीआरएफ, रेस्क्यू फोर्स आदींच्या माध्यमातून पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही अनेक गावात पूरग्रस्त अडकून आहेत. सध्या पूरग्रस्तांना सामाजिक संस्था, साखर कारखाने यांच्याकडून जेवण व चार्‍याचे नियोजन केले जात आहे. तर आरोग्य विभागाकडून स्थलांतर केलेल्या नागरीकांची कोरोना तपासणी करून औषध उपचार करण्यात येत आहे. सातत्याने येत असलेल्या महापूराने पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू मात्र संपेना झाल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात आहे.

पिण्याच्या पाण्याची टंचाई

तालुक्यात सर्वत्र महापूर आलेले असताना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ग्रा.पं.कडून पुरग्रस्तांना पाण्याची सोय करून देण्यात येत आहे. तर जयसिंगपूरचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी नविन कनेक्शन टाकण्याचे काम हाती घेतले आहे.

नृसिंहवाडीचा शिरोळ-कुरुंदवाडशी संपर्क तुटला

नृसिंहवाडी : पुढारी वृत्तसेवा
दोन दिवस पावसाने उघडीप दिली असली तरी कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सध्या सर्व गावचा संपर्क तुटला आहे. शिरोळ-कुरुंदवाड-नृसिंहवाडी हा मुख्य महामार्ग बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, श्रींची मूर्ती उच्च स्थानावर ठेवण्यात आली आहे.

पहाटेपासून रात्रीपर्यंत महापुराच्या पाण्यातही समस्त पुजारी मंडळाच्या वतीने नित्यसेवा सुरू आहे. बेटाचे स्वरूप प्राप्त झाल्याने शासन मदतीची आवश्यकता आहे. दोन दिवस पावसाने उघडीप दिलीअसली तरी कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे त्यामुळे गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे . गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

अर्जुनवाडसह सात गावांना बेटाचे स्वरूप

शिरटी : पुढारी वृत्तसेवा
कृष्णा नदीच्या महापुराच्या पाण्याने शिरटीसह, अर्जुनवाड, कनवाड, कुटवाड, घालवाड, हसुर या 6 गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या गावांतील 4 हजारहुन अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये 17 हजारांहून अधिक नागरीकांचा समावेश आहे. याशिवाय 8 हजार जनावरांना आपल्या सोयीनुसार नातेवाईकांसह वेगवेगक्या छावणीत पाठवण्यात आले
आहेत.

सध्या चारही बाजुंनी महापुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने बाहेर पडण्याचे सर्व रस्ते बंद झाले आहेत. दरम्यान दुपारी घालवाड येथे रेस्क्यू फोर्सची एक बोट पाठवली असता तेथील नागरिकांनी आपली जनावरे असल्यामुळे बाहेर पडण्यास नकार दिला असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले. हसुर येथील जनावरांना पशुवैद्यकीय दवाखान्यातील दुसर्‍या मजल्यावर बांधण्यात आली आहे. या गावांमधील वीजपुरवठा बंद झाला आहे. पिण्याची पाण्याची देखील समस्या निर्माण झाली आहे.

दत्तवाडमध्ये दूधगंगा काठावर धास्ती

दत्तवाड : येथे महापुराने 59 कुटुंबे स्थलांतरित करण्यात आले आहेत. यामध्ये 302 नागरिक व 281 जनावरांचा समावेश आहे. पूरग्रस्तांची आक्काताई नेजे हायस्कूल येथे पूरग्रस्तांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. घोसरवाड येथील मामाचा मळा येथील 7 कुटुंबे स्थलांतरित झाले आहेत. तर नवे दानवाड येथील 40 कुटुंबे स्थलांतरित झाले असून काहीजण जनावरा सहित गुरुदत्त कारखाना येथे स्थलांतरित झाले आहेत. तसेच येथील मराठी शाळा येथेही पूरग्रस्तांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

वारणा काठावरील 4 हजार पूरग्रस्तांचे स्थलांतर

दानोळी : पुढारी वृत्तसेवा
वारणा नदीला आलेल्या महापुराने कवठेसार व दानोळीतील 700 कुटुंबांचे सुमारे 4 हजारांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कवठेसार गावाला पाण्याने पूर्ण वेढा दिला आहे.

कवठेसार आणि जुने कवठेसार येथील 150 कुटुंबातील 500 ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हालविण्यात आले आहे. त्याची व्यवस्था प्राथमिक शाळा कुंभोज येथे केली आहे. तर दानोळीतील 550 कुटुंबातील 3 हजार 500 ग्रामस्थांनी दानोळी हायस्कूल आणि नातेवाईकांकडे राहण्याची व्यवस्था केली आहे. हायस्कूलमध्ये 200 ग्रामस्थ आहेत.

ऊस, भाजीपाला, फुले या पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान काल माजी खासदार राजु शेट्टी यांनी तर आज आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दानोळीत भेट देऊन पाहणी करून सूचना केल्या. यावेळी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT