Latest

शिक्षण : परीक्षेला सामोरे जाताना…

Arun Patil

डॉ. अ. ल. देशमुख : 

विद्यार्थिदशेतील आणि एकूणच आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या आणि पुढील आयुष्याची दिशा घडवणार्‍या दहावी-बारावीच्या परीक्षा आता जवळ आल्या आहेत. हे उरलेले दिवस म्हणजे परीक्षापूर्व कालावधी आणि प्रत्यक्ष परीक्षेचा कालावधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. वर्षभर केलेल्या अभ्यासापेक्षाही उज्ज्वल यशाची वाट दाखवण्यासाठी या काळाचे खूप महत्त्व आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवनाचा विचार केला, तर दहावी-बारावीच्या परीक्षा या त्यांचे पुढचे जीवन घडवणार्‍या, पुढच्या आयुष्याची दिशा ठरवणार्‍या आणि भावी यशाची पायाभरणी करणार्‍या असतात. या परीक्षांमधील यशामुळे आई-बाबांना, संपूर्ण कुटुंबालाच आनंद प्राप्त होत असतो. यातील यशामुळे मुलांची समाजातील किंमत वाढते. इतकेच नाही, तर आपण मिळवलेल्या यशाचे स्वतःला समाधान मिळते. आत्मिक आनंद आणि आत्मविश्वास या परीक्षांमधून मिळत असतो. म्हणूनच या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा आहेत.

माझ्या मते, प्रत्येक विद्यार्थ्यानेच या परीक्षेत उत्तमच यश मिळवले पाहिजे. कारण, सध्याची परिस्थिती बघता नुसतेच पास होऊन चालण्यासारखे नाही. या परीक्षेतील उत्तम यशासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षापूर्व काळ आणि परीक्षेच्या काळात थोडेसे टेन्शन घेणे आवश्यकच आहे. माझे याबाबतीत पूर्ण वेगळे मत आहे. कारण, ताण हा दोन प्रकारचा असतो. एक सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह टेन्शन आणि दुसरे नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह टेन्शन. सकारात्मक ताण हा उपयुक्त ताण असतो. विद्यार्थ्यांनी नकारात्मक ताण घेऊ नये; पण सकारात्मक ताण अवश्य घ्यावा. कारण, त्याचा फायदा होणारच आहे. या ताणामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते. या शेवटच्या कालावधीत वाचलेलं लक्षात राहण्याचं प्रमाण खूप जास्त असते. हे अनेकांनी अनुभवले असेल. ही गोष्ट पॉझिटिव्ह टेन्शनचा परिणाम असते, हे लक्षात घ्यायला हवं.

हे उरलेले दिवस म्हणजे परीक्षापूर्व कालावधी आणि प्रत्यक्ष परीक्षेचा कालावधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. वर्षभर केलेल्या अभ्यासापेक्षाही उज्ज्वल यशाची वाट दाखवण्यासाठी या काळाचे खूप महत्त्व आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर टी-20 किंवा एकदिवसीय सामन्यांचे देता येईल. यामध्ये 15 षटकांमध्ये 80 धावा होतात किंवा 40 षटकांत 200 धावा होतात; पण टी-20 च्या शेवटच्या पाच षटकांमध्ये अंतिम धावसंख्या अनेकदा 180 पर्यंत जाते, तर एकदिवसीय सामन्यात ती 300 पर्यंत जाते. कारण, या शेवटच्या पाच-दहा षटकांमध्ये खेळाडू तुटून पडलेला असतो आणि संपूर्ण क्षमतेने प्रत्येक फटका मारत असतो. हाच फॉर्म्युला आपण परीक्षेच्या या कालावधीसाठीसुद्धा लावू शकतो. या कालावधीत अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे. सराव परीक्षेत किंवा प्रीलियममध्ये कमी गुण पडले असतील, तरीही निराश होण्याची अजिबात गरज नाही. पूर्ण क्षमतेने अभ्यासात झोकून दिले; तर यश नक्कीच मिळू शकते, हे लक्षात घ्यावे.

विद्यार्थ्यांनी गुणांची काळजी कधीही करू नये किंवा कोणा दुसर्‍याचा विचारही करू नये. भावाला इतके गुण मिळाले किंवा मित्राला इतके गुण मिळाले, अशी तुलना करू नये. ज्याने त्याने स्वतःसाठी लढावे. स्वतःशीच स्पर्धा करावी. सराव परीक्षेत 76 टक्के मिळाले असतील, तर वार्षिकमध्ये 82 टक्के कसे मिळतील, असा विचार करून त्याद़ृष्टीने प्रयत्न करावेत. मी स्वतःचाच विचार करेन, सराव परीक्षांची उत्तरपत्रिका तपासून बघेन आणि प्रत्येक विषयात कोणत्या प्रश्नात माझे गुण कमी झाले आहेत, कुठली गोष्ट मला व्यवस्थित जमलेली नाही याचे निरीक्षण करेन, असा प्रत्येकाने विचार करावा.

टेस्ट सीरिजच्या उत्तरपत्रिका अभ्यासाव्यात आणि नेमक्या चुका कमी कराव्यात. असे प्रयत्न केले, तर उत्तम गुण नक्कीच मिळू शकतात. स्वतःचाच स्वतःशीच केलेला लढा खूप फायद्याचा ठरतो. मला तर वाटते की, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःची मार्कलिस्ट स्वतःच तयार करावी. ध्येय निश्चित करावे आणि त्यानुसार प्रत्येक विषयाच्या पुढे आपले गुण लिहावेत. निश्चयाचे फळ नक्कीच गोड असते. इतरांशी तुलना करून दुःखी होऊ नये. माझी परिस्थितीच अशी आहे, माझे आई-वडील शिकलेले नाहीत, अशा कारणांना काही अर्थ नाही. त्यामुळे स्वतःसाठी लढण्याचा प्रयत्न करून, चुका दुरुस्त करून पुढे जावे.

विद्यार्थ्याने मनात कोणताही न्यूनगंड आणू नये. कमी गुण मिळाले तर काय होईल, अपयश आले तर काय होईल, असा विचार न करता आपल्यासमोर आव्हान आहे आणि त्याला आपल्याला सामोरे जायचे आहे, असा विचार करावा. असा विश्वास ठेवला तर ताण येणारच नाही आणि उज्ज्वल यश मिळेल. मनाच्या श्लोकांमध्ये एक ओळ आहे, 'सामर्थ्य आहे चळवळीचे' तर मी म्हणेन 'सामर्थ्य आहे कष्टाचे, जो जो करील तयाचे.' या दोन्ही परीक्षा बुद्धिमत्तेच्या नसून, कष्टाच्या आहेत. तो हुशार आहे, मी नाही, असा विचार करू नये. कष्ट करा, नियमित अभ्यास करा, गुण आपोआप तुम्हाला मिळतील.

या परीक्षेच्या कालावधीत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विद्यार्थ्यांनी आपले रूटिन अजिबात सोडू नये. वर्षभर जर तुम्ही सात ते आठ तास झोप घेत असाल, तर याही कालावधीत तेवढीच झोप घ्या. उगाच जास्त अभ्यास करायचा म्हणून चारच तास झोपायचे, असे करू नये. तसेच पुरेसे जेवावे. काही जण झोप येईल म्हणून कमी जेवतात; पण तसे करू नये. त्यामुळे एनर्जी कमी होते. थोडा वेळ टी.व्ही. बघत असाल तर तोही बघावा; पण अगदी कमी वेळ. रोज खेळण्याची सवय असेल तर अर्धा-एक तास खेळून यावे. दिवसभर अभ्यासच घेऊन बसलात, तर एका मर्यादेनंतर अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यामुळे आपल्या नियमित सहजप्रवृत्ती टाळू नयेत. खेळल्यामुळे चिंता, क्लेश, दुःख या सर्व गोष्टी मुले विसरतात. म्हणूनच मी सर्वांनाच सांगेन म्हणजे समुपदेशक, पालक, शिक्षक सर्वांनीच मुलांना त्यांचे दैनंदिन सवयीच्या गोष्टी कराव्यात. म्हणजे मुले मोकळ्या मनाने परीक्षेला सामोरी जातील. तसेच या काळात रिलॅक्सेशन एक्सरसाईज खूप महत्त्वाचा असतो.

दोन-अडीच तासांनी उठावे, वॉर्मअपचे थोडेसे व्यायाम करावेत जेणेकरून ताण निघून जाईल किंवा दर दोन-अडीच तासांनी पाच मिनिटांसाठी शवासन करावे. शवासन अतिशय ऊर्जावर्धक असते. दिवसातून पाचवेळा जरी ते केले, तरी संपूर्ण मनावरचा आणि शरीरावरचा ताण निघून जातो. ताण घालवण्याची आणखी एक पद्धत म्हणजे उठून स्वयंपाकघरात जावे. डबे शोधावेत, पालकांनीही या काळात डब्यांत शेंगदाणे, लाडू, चिवडा असा खाऊ भरून ठेवावा. डबा उघडून थोडेसे खावे आणि पुन्हा अभ्यासाला बसावे. अर्थात, हे खाणे नियंत्रणात असावे; अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो.

सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे, या कालावधीत नातेवाईकांनी विनाकारण घरी येऊ नये. सराव परीक्षेत किती गुण पडले, एवढेच पडले का, इतके कमी कसे पडले, अशी निराशाजनक, नकारात्मक वाक्ये विद्यार्थ्यांसमोर बोलू नयेत. कोणाकडेही जाऊन अशाप्रकारचा त्रास देऊ नये. घरी आले म्हणजे बोलले जाते आणि मुलांसमोर या गोष्टी बोलल्या, तर मुले विचलित होतात. विद्यार्थ्यांना त्यांचे काम आनंदाने करू द्यावे. आई-वडिलांनीसुद्धा तुला अमुक विषयात सराव परीक्षेत कमी गुण मिळाले होते बरं का, आता त्याचा जास्त अभ्यास कर, अशा आशयाची वाक्ये वारंवार मुलांना ऐकवू नयेत.

आपण कुठल्या विषयात कमी आहोत याची मुलांना पुरेपूर जाणीव असते. त्यांच्यावर विश्वास टाकला म्हणजे ती मुले बरोबर त्या विषयाचा अभ्यास करतात. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार केला, तर त्यांनी एक गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेवावी की, या दिवसात तळलेलं मुळीच खाऊ नये. तसेच कोल्ड्रिंक अजिबात पिऊ नये. कारण, या दोन गोष्टींमुळे घसा धरतो आणि आजारी पडण्याची दाट शक्यता असते. आजारी पडलात तर वर्षभराची संपूर्ण मेहनत व्यर्थ जाते. परीक्षा झाल्यावर तुम्ही हे पदार्थ कितीही खाऊ शकता. तसेच या कालावधीत विद्यार्थी खूप कमी पाणी पितात; तर असे न करता भरपूर पाणी प्यावे. घरी पालकांनी लिंबाचे सरबत तयार करून ठेवावे. जेवढे पाणी पोटात जाईल तेवढा ताजेपणा जाणवत राहील, हे लक्षात घ्यावे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT