Latest

शाहू स्टेडियमवरील हस्तांतरणास मनाई

अमृता चौगुले

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :  शाहू स्टेडियमवर यापुढे पूर्व परवानगी खेरीज कोणतेही हस्तांतरण करण्यास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मनाई केली आहे. याबाबतचे आदेश दिले आहेत. शाहू स्टेडियमच्या जागेला लागू असलेला 'ब' धारणा (बी टेन्यूअर) प्रकारही कायम राहील, असेही जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

रावणेश्वर तलावाची सि.स.नं. 2607 अ, ब, 2608-4, 5 आणि 2612 ही जागा 22 मे 1942 रोजी एक रुपये भाडेतत्त्वाने कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनला देण्यात आली आहे. या जागेपासून मिळणारे उत्पन्न शारीरिक शिक्षणासाठी खर्च करणे बंधनकारक होते. मात्र, शाहू स्टेडियमच्या इमारतीत दुकान गाळे बांधून ते हस्तांतरित केल्याने शर्थभंग झाल्याची तक्रार करत ही जागा सरकार हक्कात घेण्याची मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी केली होती.

त्यानुसार करवीर प्रांतांनी चौकशी अहवाल जिल्हाधिकार्‍यांना दिला होता. त्यावर ही जागा सरकारी हक्कात घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. त्यानुसार ही जागा सरकारी हक्कात घेतली होती. त्याला कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने पुणे विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. त्यामुळे हा आदेश रद्द करत याप्रकरणी फेरसुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले होते.

सुनावणी दरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांवरून ही जागा सरकारीच असल्याचे सिद्ध झाले आहे. या जागेचा यापुढे खेळासाठीच वापर करावा लागेल. दुकानगाळ्यांसह अन्य बांधकाम आदीची खरेदी-विक्री, तारण-गहाण, करार आदी कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण, दुरुस्ती, बांधकाम याला मनाई केली आहे.

खेळ सुरूच राहणार

शाहू स्टेडियम हे खेळासाठीच देण्यात आले आहे. यापूर्वी झालेल्या आदेशात आणि आता झालेल्या आदेशातही या स्टेडियमवर खेळ सुरूच राहणार आहे. त्याला कोणत्याही प्रकारची आडकाठी करण्यात आलेली नाही. केवळ स्टेडियमधील दुकान गाळे, अन्य काही बांधकाम, नवीन बांधकाम, दुरुस्ती आदी परवानगी खेरीज करता येणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT