Latest

व्हॅक्सिन पॅच च्या माध्यमातून मिळेल इंजेक्शन!

Arun Patil

न्यूयॉर्क : लसीकरणादरम्यान अनेक लोक इंजेक्शनची सुई पाहून भयग्रस्त होत असतात. ही भीती दूर करण्यासाठी सध्या जगभरातील संशोधक वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करीत आहेत. आता अमेरिकन वैज्ञानिकांनी थ्रीडी प्रिंटेड व्हॅक्सिन पॅच तयार केला आहे. त्यामुळे लस देणे अधिक सोपे व वेदनारहीत होईल.

अमेरिकेच्या स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा व्हॅक्सिन पॅच विकसित केला आहे. लवकरच त्याच्या चाचण्या सुरू होतील.

पहिली चाचणी प्राण्यांवर केली जाईल. या पॅचला मंजुरी मिळावी यासाठी वैज्ञानिकांनी अमेरिकेतील प्रशासनाकडे अर्ज केला आहे. दंडावर सुईने लस देण्याऐवजी असा पॅच लावला तर हा पॅच दहापट अधिक वेगाने रोगप्रतिकारक प्रतिसाद देतो.

पॅचच्या मदतीने लस शरीरात पोहोचल्यावर टी-सेल्स आणि अँटिबॉडीचा प्रतिसाद दंडावर सुई टोचून दिल्या जाणार्‍या लसीच्या तुलनेत अधिक वेगवान असतो. या पॅचच्या मदतीने त्वचेच्या रोगप्रतिकारक पेशींपर्यंत लस थेट पोहोचवली जाऊ शकते. त्यामुळे लसीचा पुरेपूर व अधिक चांगल्या रितीने उपयोग होतो.

उंदरांवर अशा पॅचच्या सहाय्याने लस दिल्यावर त्यांच्या अँटिबॉडीचा प्रतिसाद अतिशय वेगवान होता असे दिसून आले. व्हॅक्सिन पॅच मध्ये अतिशय बारीक थ्रीडी प्रिंटेड मायक्रोनिडल (सुई) बसवलेल्या आहेत. या पॅचला त्वचेवर लावून लस देतात. सामान्य सुईच्या तुलनेत यामुळे होणार्‍या वेदना अतिशय कमी असतात.

SCROLL FOR NEXT