Latest

व्हाईट कॉलर गुन्हेगारीला ‘खाकी’चं बळ

मोहन कारंडे

कोल्हापूर; दिलीप भिसे : राजकीय आश्रय, वर्चस्वासाठी गावगुंडांची फौज अन् काळ्या धंद्यांतील मिळकतीमुळे टोळ्यांनी शहर व उपनगरामध्ये दहशतीचे साम्राज्य निर्माण केले आहे. कायद्याचा धाक झुगारलेल्या 'व्हाईट कॉलर' गुन्हेगारीला करवीरसह अन्य काही पोलिस ठाण्यांतर्गत झारीतील शुक्राचार्यांकडून बळ मिळू लागल्याने बोंद्रेनगर, फुलेवाडी, रंकाळा टॉवर, लक्षतीर्थ वसाहतीचा परिसर अशांत टापू बनू लागला आहे. काळे धंदेवाल्यांसह सावकारी टोळ्यांच्या पिळवणुकीने परिसरातील 'कॉमन मॅन' भीतीच्या छायेखाली वावरतो आहे.

नंग्या तलवारी, चाकू, कोयते, हॉकी स्टिकसह धारदार शस्त्रांनी भर चौकात होणार्‍या हल्ल्यांच्या घटना नित्याच्या बनल्या आहेत. अगदी क्षुल्लक कारणातूनही इथं तलवारी फिरवल्या जात आहेत. तरुणांना घरातून फरफटत आणून भर चौकात अर्धमेला होईपर्यंत धुलाई केली जात आहे. कुटुंबीयांच्या डोळ्यादेखत राडा केला जात आहे. कायद्याचा धाक नसलेल्या काही संघटित टोळ्यांच्या म्होरक्यांसह साथीदारांनी दहशतीचे साम्राज्य निर्माण केले आहे.

अलीकडच्या काळात रंकाळा टॉवर, लक्षतीर्थ वसाहत परिसरात घडलेल्या जीवघेण्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भीती आणि चिंतेचे सावट असतानाच राजकीय वर्चस्वातून लक्षतीर्थ वसाहतीतील सासने कॉलनीत सोमवारी रात्री उशिरा जोरात राडा झाला. बोंद्रेनगर, फुलेवाडी परिसरात स्वत:ला स्वयंघोषित नेता समजून घेणार्‍या विजय ऊर्फ रिंकू देसाईसह साथीदारांनी प्रचंड दहशत माजविली. तलवारी, कोयत्यांसह लोखंडी गज, लाकडी बांबूने दोघांवर हल्ला करून त्याना अर्धमेला केला.

रिंकू देसाईसह साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. राजकीय आश्रयाने सोकावलेल्या टोळक्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली आहे. परिसरात घडणार्‍या लहान-मोठ्या गुन्ह्यातील संशयितांना पाठीशी घालून पोलिस कारवाईपासून वाचविण्यासाठी टोळीचा सतत आटापिटा सुरू असतो. फिर्यादी पोलिस ठाण्यात दाखल होण्यापूर्वीच म्होरक्यांची 'स्वारी' करवीर पोलिस ठाण्याच्या दारात पोहोचलेली असते. रात्रंदिवस त्यांचा ठाण्याच्या आवारात ठिय्या पडलेला असतो.

काळे धंदेवाल्यांचे फोफावतेय साम्राज्य!
बोंद्रेनगर, फुलेवाडी रिंग रोड, शिंगणापूरसह रंकाळा टॉवर परिसरात अलीकडच्या काळात काळे धंदेवाल्यांचे साम्राज्य फोफावले आहे. काळ्या धंद्यातून मिळणार्‍या रसदीमुळेही संघटित गुन्हेगारी टोळ्या सोकावल्या आहेत. हातावरची पोट असलेल्या छोट्या-छोट्या व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावले जात आहे. जीवघेण्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. तीनपानी जुगारी अड्ड्यांतून सराईत गुन्हेगारी टोळ्यांची उठबस सुरू झाली आहे. निर्जन ठिकाणी गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू आहेत. मटक्याच्या टपर्‍या सुरू झाल्या आहेत. सराईत टोळ्यांना जणू काही काळ्या धंद्यांसाठी मुक्त परवानाच दिला आहे की काय, अशीच स्थिती आहे.

रिंकू देसाईसह साथीदारांवर कठोर कारवाई : मंगेश चव्हाण
बोंद्रेनगर, फुलेवाडीसह लक्षतीर्थ वसाहत परिसरात दहशत माजवून गुंडागर्दी करणार्‍या विजय ऊर्फ रिंकू देसाई व त्याच्या साथीदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. संशयितांच्या गैरकृत्यांना पाठीशी घालणार्‍यांचीही चौकशी करून वरिष्ठाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्यात येईल, असे शहर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

टोळ्यांच्या कारनाम्यामुळे परिसर ठरतोय संवेदनशील!

बोंद्रेनगरसह फुलेवाडी रिंगरोड, शिंगणापूर, लक्षतीर्थ वसाहत हा शहराचा विस्तारित भाग मध्यमवर्गीयांसह श्रमजीवी घटकांच्या बहुसंख्य वस्तीचा परिसर म्हणून ओळखला जातो. मात्र अलीकडच्या काळात संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या कारनाम्यांमुळे हा परिसर संवेदनशील ठरला आहे. राजकीय वर्चस्व, खासगी सावकारी आणि गुंडागर्दीमुळे परिसरातील गोरगरीब तरणी पोरंही पोलिस रेकॉर्डवर येऊ लागली आहेत. 'आपणाला कोणी तरी सोडविणारा आहे' ही भावना तरुणांमध्ये निर्माण होऊ लागल्याने परिसरात गुन्हेगारीचे प्रस्थ वाढू लागले आहे.'व्हॉईट कॉलर' गुन्हेगारीमुळे शेकडो तरणी पोरं गुन्हेगारीच्या विळख्यात सापडली आहेत.

SCROLL FOR NEXT