Latest

वोल्दोमिर झेलेनस्की : खारकीव्हच्या चार गावांतून रशियन सैनिकांना पिटाळले!

Arun Patil

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : युक्रेनच्या खारकीव्ह भागातील चार गावांमधून युक्रेनच्या लष्कराने रशियन फौजेला पिटाळून लावल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमिर झेलेनस्की यांनी केला आहे.

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी म्हटले आहे की, या भागातून माघार घेण्यास रशियाला भाग पाडू शकतो. रशिया कीव्हवर लवकर ताबा मिळवण्यात अपयशी ठरला. त्यांच्या लष्कराचे लक्ष डोनबासच्या औद्योगिक भागात केंद्रित झाले. आम्ही लष्करी आघाडीवर भक्कम आहोत. डोनबासची लढाई जिंकलो तर आमच्या रणनीतीसाठी ते महत्त्वाचे असेल.

दरम्यान, युक्रेनच्या नैसर्गिक वायू पाईपलाईन ऑपरेटरने पूर्वेकडील एका प्रमुख केंद्राच्या माध्यमातून रशियाची शिपमेंट रोखली आहे. मास्को समर्थक फुटीरवाद्यांच्या नियंत्रणातील पूर्व युक्रेनमधील एका भागात नैसर्गिक वायू पुरवठा रोखणार आहे. पश्चिम युरोपला जाणार्‍या रशियन नैसर्गिक वायूच्या एकूण पुरवठ्यापैकी एक तृतियांश नैसर्गिक वायूचा व्यवहार या केंद्रातून चालतो.

फेब्रुवारीत युद्धाला सुरुवात झाल्यापासून प्रथमच येथे नैसर्गिक वायू पुरवठा बाधित झाला आहे. तथापि, रशिया युरोपातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी युक्रेन नियंत्रित भागाच्या माध्यमातून नैसर्गिक वायूचा प्रवाह हस्तांतरीत करण्यासाठी भाग पाडू शकतो.

SCROLL FOR NEXT