Latest

वैभव नाईक म्हणाले, आज हीच ती वेळ आहे… शिवसेनाप्रती निष्ठा दाखवायची!

Arun Patil

कुडाळ ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेले दोन दिवस घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत व शिवसेना पक्षाशी ठाम राहणार्‍या कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आ. वैभव नाईक यांचे शुक्रवार 24 जून रोजी सकाळी 10.30 वा. कुडाळ शहर शिवसेना शाखा येथे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आ. वैभव नाईक यांच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांना भक्कम पाठबळ देण्यासाठी शिवसैनिक यावेळी एकत्र जमणार आहेत.

आज हीच ती वेळ आहे, शिवसेनेच्या प्रती निष्ठा दाखवायची, शिवसेनेचे बळ दाखवायची आणि मी उध्दवजींचा शिवसैनिक आहे म्हणण्याची… असा नारा देत शिवसैनिक यावेळी जमणार आहेत, अशी माहिती कुडाळ तालुका शिवसेनेकडून देण्यात आली आहे.

राज्यात गेले दोन दिवस विविध राजकीय घडामोडी घडत असून शिवसेनेचे बंडखोर आमदार आसाम-गुवाहाटी येथे गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक यांनी आपण शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची भूमिका स्पष्ट करीत मुख्यमंत्र्यांना पाठबळ दिले. गेले चार दिवस आ. वैभव नाईक मुंबईत ठाण मांडून आहेत. शुक्रवारी ते कुडाळ – मालवण मतदारसंघात येऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

हिंदुत्वाचा वसा आणि वारसा घेतलेल्या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लोककल्याणकारी राज्याला काही ढोंगी व मतलबी लोकांच्या भूलथापांना बळी पडून शिवसेनेमधील अल्पसंतुष्टांनी नेतृत्वाला थेट आव्हान देण्याचा नाहक प्रयत्न केला आहे. शिवसेनाप्रमुख व शिवसेना पितृतुल्य मानत मातोश्रीला परमेश्वरासमान मानणार्‍या आपल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा अपमान शिवसैनिक कदापी सहन करणार नाहीत, असे कुडाळ तालुका शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

चला यासाठी आपण जमवूया शुक्रवार 24 सकाळी 10.30 वा. कुडाळ शहर शाखेमध्ये, असा नारा दिला आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठबळ देण्यासाठी व आ. वैभव नाईक यांचे स्वागत करून त्यांचे हात बळकट करण्यासाठी कुडाळ शहर तसेच तालुक्यातील सर्व आजी- माजी सर्व पदाधिकारी, जिल्हाप्रमुख व तालुका प्रमुख, तालुका संघटक, विभागप्रमुख शाखा प्रमुख शिवसेनेच्या अंगीकृत संघटना, नगरसेवक, सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे व शहरप्रमुख संतोष शिरसाट यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT