Latest

कोल्‍हापूर : सूनेने मटणात विष कालवून सासऱ्याचा केला घात, उलटी झाली अन् दिरासह सासू बचावले

backup backup

बाचणी / कागल : पुढारी वृत्तसेवा जमिनीच्या वाटणीवरून असलेल्या वादातून मटणाच्या जेवणात विषारी औषध घातल्याने अत्यवस्थ झालेल्या आण्णाजी बापू जाधव (वय 72, रा. बाचणी, ता. कागल) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सून रूपाली दत्तात्रय जाधव हिच्यावर मटणाच्या जेवणात विषारी औषध घातल्याचा संशय आहे. रुपाली फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. बाचणी येथील आण्णाजी जाधव यांना दत्तात्रय व नामदेव ही दोन मुले आहेत. अण्णाजी यांनी आपली मालमत्ता दोन्ही मुलांच्या नावे केली होती. पान 9 वर

दत्तात्रय याचा 12 वर्षापूर्वी कावणे येथील रुपाली हिच्याशी विवाह झाला. त्यांना मुलगा व मुलगी अशी दोन अपत्य आहेत. एक वर्षापूर्वी दत्तात्रय याचा कोरोनानेे मृत्यू झाला. त्यानंतर रुपाली सर्व मालमत्ता विकणार असल्याची कुणकुण आण्णाजी यांना लागली. त्यामुळे त्यांनी स्वतःच केलेला दस्त रद्द करून आपल्या संपत्तीत मुलींचीही नावे लावण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यामुळे रुपाली अस्वस्थ होती.

26 जुलै रोजी तिने सासरे आण्णाजी व दीर नामदेव यांना मटण बनवून दिले. ते खाल्ल्यानंतर काही वेळातच आण्णाजी यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्रथम शासकीय व नंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी (दि. 10) सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

सुनेचा शोध सुरू

कावणे (ता. करवीर) येथील माहेरी राहणार्‍या सून रुपालीला अटक करण्यासाठी पोलिस गेले असता घरातील आई, वडील, भावासह ती फरार झाल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रक्षाविसर्जन

दरम्यान, बाचणी ग्रामस्थांनी रुपालीला अटक केल्याशिवाय आण्णाजी जाधव यांची रक्षा विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला. कागल पोलिस निरिक्षक अजितकुमार जाधव, पी. एस. आय. ए. वाय. खडके यांनी बाचणीला भेट देऊन जाधव यांचा शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी रक्षा विसर्जित केली. दरम्यान, नातेवाईकांनी रुपालीला अटक करुन कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, कागल तहसिलदार व पोलिस निरिक्षक यांना निवेदन दिले.

SCROLL FOR NEXT