Latest

विरार मधील 16 वर्षीय शास्त्रज्ञाने केली समुद्राच्या पाण्यापासून वीजनिर्मिती

Arun Patil

मुंबई ; राजेश सावंत : विरार मधील एका 16 वर्षीय हर्ष कुंजन चौधरी या मुलाने आर्थिक पाठबळ नसतानाही नवनवीन प्रयोग करण्यावर भर दिला आहे. अलीकडेच समुद्राला येणार्‍या भरती ओहोटीचा अभ्यास करून त्याने वीज निर्मितीचे यंत्र बनवले आहे. या यंत्राची चाचणी त्याने बोर्डी येथील समुद्रात केली आहे. या यंत्राचा आधार घेऊन समुद्रात मोठा वीज प्रकल्प उभारणे शक्य असल्याचा दावाही त्याने केला आहे.

विरार च्या नॅशनल हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या हर्षला लहानपणापासूनच काहीतरी आपण वेगळे करावे असे वाटत होते. आई वडिलांची साथ मात्र आर्थिक पाठबळ फारसे नसल्यामुळे अगदी भंगारातील वस्तूंचा वापर करून त्याने नवनवीन प्रयोग करण्यावर भर दिला. याची दखल नासानेही घेतली होती.

अंडर वॉटर रोबोटिक स्पर्धेसाठी हर्षची नासाकडून निवड करण्यात आली होती. मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर येथे झालेल्या राष्ट्रीय नवप्रवर्तन उत्सव आणि मेगा प्रदर्शन 2020 मध्ये भारतातून निवडलेल्या आणि निवडक 950 प्रकल्पांपैकी 27 प्रकल्पाच्या यादीमध्ये हर्षच्या प्रकल्पाची निवड झाली होती.

कोरोनाच्या काळात सामाजिक दुरीकरण यंत्राची निर्मितीही त्याने केली होती. घड्याळाच्या आकाराचे हे यंत्र आपण हस्तांदोलन करताना आणि चेहर्‍याला स्पर्श करताना आपल्याला व्हायब्रेशन करून इशारा देते. अशा नवनवीन प्रयोगासह त्याने आता समुद्राच्या पाण्यापासून वीज निर्मितीचे यंत्र तयार केले आहे.

सिंधुदुर्ग ते पालघरपर्यंत महाराष्ट्राला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्राला येणार्‍या भरती व ओहोटीच्या पाण्याचा उपयोग करून वीज निर्मिती यंत्र चालवण्याचा हर्ष याचा मानस आहे. विज निर्मितीचे लहान यंत्र तयार करून, त्याने अलीकडेच त्याची चाचणी बोर्डी येथील समुद्रात घेतली.

ही चाचणी यशस्वी झाली असून यातून विज निर्मिती झाल्याचा दावा हर्ष याने केला आहे. या यंत्राचा आधार घेऊन सरकारच्या माध्यमातून समुद्रामुळे मोठा प्रकल्प उभा करता येऊ शकतो. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे मच्छीमारीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावाही हर्ष याने केला आहे.

SCROLL FOR NEXT