Latest

विमानांची आसनमर्यादा हटविण्याचा निर्णय : हवाई वाहतूक मंत्रालय

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे संक्रमण घटल्याने विमानांची आसनमर्यादा हटविण्याचा निर्णय केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. यामुळे देशांतर्गत विमानांना आता 100 टक्के प्रवासी क्षमतेसह उड्डाण करता येणार आहे.आज 18 ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

कोरोनामुळे प्रवाशांची सुरक्षा आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यासाठी विमानातील एकूण प्रवासी क्षमतेवर मर्यादा घातली होती. लॉकडाऊनदरम्यान देशांतर्गत उड्डाणांवर पूर्ण बंदी घातल्यानंतर 25 मे 2020 रोजी 33 टक्के आसन क्षमतेसह विमानसेवा सुरू झाली. डिसेंबर 2020 पर्यंत हळूहळू ही मर्यादा 80 टक्क्यांपर्यंत वाढविली.

परंतु दुसर्‍या लाटेचे संक्रमण वाढल्याने 1 जून 2021 रोजी पुन्हा एकदा आसन क्षमता 50 टक्क्यांवर आणण्यात आली. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांच्या अडचणीत वाढ झाली. जूनपासून दुसर्‍या लाटेचे संक्रमण कमी झाल्याने प्रवासी क्षमता पूर्ववत करण्याची मागणी विमान कंपन्यांकडून जोर धरत होती.

विमान कंपन्यांसमोरील अडचणी आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता हवाई वाहतूक मंत्रालयाने प्रवासी क्षमता 65 टक्के करण्याचा निर्णय 5 जूनला घेतला. त्यानंतर 12 ऑगस्टला ती 72.5 टक्के, तर 20 सप्टेंबरला 85 टक्क्यांपर्यंत वाढविली.

विमानांची आसनमर्यादा आता 100 टक्के आसन क्षमतेसह उड्डाण करण्याची मुभा दिली असली तरी संबंधित विमान कंपन्या आणि विमानतळ प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT