Latest

विमा मिळवण्यासाठी केला स्वत:च्या मृत्यूचा बनाव!

Arun Patil

नगर ; पुढारी वृत्तसेवा : पैशांसाठी कोण कुठल्या थराला जाईल सांगता येत नाही. नगर जिल्ह्यातील एक महाभाग त्यासाठी खास अमेरिकेतून आपल्या गावी आला. अमेरिकेत त्याने स्वत:चा 37 कोटी रुपयांचा विमा काढलेला होता. ही रक्‍कम लाटण्यासाठी अन्य चौघांची मदत घेऊन एका मनोरुग्णाचा खून त्याने केला व स्वत:च मरण पावलेला आहे, अशी कागदपत्रे बनविली.

हा खळबळजनक प्रकार नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील धामपणगाव पाट येथे उघडकीला आला आहे. राजूर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला.

स्वयंपाक्याचा कट शिजला नाही

गेली 20 वर्षे अमेरिकेत राहात असलेल्या आणि तेथे स्वयंपाकी म्हणून काम करत असलेला प्रभाकर वाकचौरे याने आपल्या गावी येऊन हा कट रचला. नवनाथ आनप या मनोरुग्णाची हत्या केली आणि जणू प्रभाकर वाकचौरेच मरण पावला आहे, असे भासविण्यात आले.

प्राप्‍त माहितीनुसार प्रभाकरने 2013 साली पत्नीचा 10 लाख डॉलरचा आणि स्वतःचा 50 लाख डॉलरचा विमा अमेरिकेतील ऑल स्टेट इन्श्युरन्स कंपनीतून उतरविलेला होता. प्रभाकर भारतात आपल्या गावी आला. आपल्या 4 साथीदारांच्या मदतीने 4 महिने नियोजन करून त्याने हा हत्येचा कट रचला. प्रभाकरने मनोरुग्णाचा खून करण्यासाठी

विषारी सापाचा वापर केला. मनोरुग्णाला सर्पदंश करवून स्वतःचा मृत्यू झाल्याचे पुरावे तयार केले. पुरावे आणि कागदपत्रे वाकचौरे याने विमा कंपनीकडे सादर केले. मात्र संशय आल्याने विमा कंपनीने राजूर पोलिसांची मदत घेतली. राजूर पोलिसांनी सत्य उघडकीला आणले. या प्रकरणी वाकचौरेसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT