Latest

विधानपरिषद रणधुमाळी : आघाडीचे कागदावर पुरेसे संख्याबळ

अमृता चौगुले

मुंबई; सुरेश पवार : येत्या 20 जूनला विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यसभा निवडणुकीत नाट्यमय निकाल लागल्याने याही निवडणुकीत चमत्कार घडेल, अशी चर्चा आहे. कागदावर तरी सत्तारूढ महाविकास आघाडीचे संख्याबळ भक्कम आहे आणि सहा जागा निवडून येण्यासाठी पुरेसे आहे. भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. भाजपने पाचवा उमेदवार उभा केला असून गणित आणि मत व्यवस्थापनाच्या जोरावर पाचवा उमेदवार विजयी होऊ शकेल, असा भाजपचा दावा आहे. राज्यसभेचा अनुभव पाहता ते अशक्य आहे, असे  म्हणता येत नाही. त्यामुळे पुरेसे संख्याबळ असले तरी महाविकास आघाडीला डोळ्यात तेल घालून मत व्यवस्थापन करावे लागणार आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक या तुरुंगात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघा नेत्यांना राज्यसभेवेळी मतदानाचा अधिकार मिळाला नव्हता. तो अधिकार मिळाला तर उमेदवार निवडीच्या मतांचा कोटा 27 होईल. या दोघांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही तर हा कोटा 26 चा होईल.

पक्षांचे संख्याबळ

महाविकास आघाडीतील शिवसेनेचे आमदार 55 आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ 51 आणि काँग्रेसचे 44 आहे. या तीन पक्षांचे मिळून 150 एवढे संख्याबळ होते. 26 चा कोटा ठरला तर आघाडीला 156 मते लागतात आणि 27 चा कोटा ठरला तर आघाडीला 162 मते लागतात. अर्थात प्रत्येक पक्ष सुरक्षा म्हणून आपापल्या सोयीने कोट्यापेक्षा एक दोन मते अधिक मिळतील अशी व्यवस्था करीत असतो. 26 किंवा 27 च्या कोट्यात शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतात. 26 च्या कोट्यात सेनेकडे तीन मते जादा राहतात तर 27 च्या कोट्यात एक मत जादा राहते. 26 च्या कोट्यात राष्ट्रवादीचे दोघे विजयी होऊ शकतात आणि एक मत जादा शिल्लक राहते. 27 चा कोटा झाल्यास राष्ट्रवादीला एका मत जमवावे लागते.

काँग्रेसची एक जागा निवडून येऊ शकते. दुसर्‍या जागेसाठी 26 च्या कोट्यात 8 आणि 27 च्या कोट्यात 10 मताची जोडणी करावी लागते.
महाविकास आघाडीतील छोटे पक्ष आणि अपक्ष अशा 22 जणांचा पाठिंबा आहे. काँग्रेस उमेदवाराला निवडून येण्यासाठी 8 किंवा 10 मतांची गरज आहे. ही कमी पडणारी मते आघाडीला पाठिंबा देणार्‍या छोट्या पक्षातून आणि अपक्ष आमदारातून मिळू शकतात.

आघाडीकडे संख्याबळ तर भाजपकडे बुद्धिबळ

ही आकडेवारी लक्षात घेतली तर आघाडीकडे पुरेशे संख्याबळ असल्याचे स्पष्ट होते. मात्र राज्यसभा निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्या बुद्धी चातुर्याने खेळी केली, ते लक्षात घेता, याहीवेळी चमत्कार घडणारच नाही असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. त्यामुळे आता ताकही फुंकून प्यावे अशी वेळ आल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे, ते खरेच म्हटले पाहिजे.

'महाविकास'चे संख्याबळ

बहुजन विकास आघाडी (3 आमदार), सपा (2), एमआयएम (2), माकप (1) या पक्षांचा आघाडीला पाठिंबा आहे. बच्चू कडू (2), राजेंद्र पाटील यड्रावकर, शंकरराव गडाख यांनीही आघाडीला पाठिंबा दिला आहे. देवेंद्र भुयार, संजयमामा शिंदे, श्यामसुंदर शिंदे, किशोर जोरगेवार, आशिष जयस्वाल, मंजुळा गावीत, नरेंद्र भोंडेवार, चंद्रकांत पाटील, गीता जैन, व विनोद आग्रवाल हे अपक्ष आघाडीबरोबर आहेत.

भाजपला पाठिंबा देणारे पक्ष व अपक्ष आमदार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आमदार भाजपबरोबर आहे तर जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे, प्रकाश आवाडे, महेश बालदी, रवी राणा, रत्नाकर गुट्टे आणि राजेंद्र राऊत या सहा आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे.

गुप्त मतदानामुळे काय परिणाम होणार ?

राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपला पहिल्या पसंतीची 123 मते पडली होती. म्हणजे भाजपला संख्याबळापेक्षा 10 मते अधिक पडली होती. राज्यसभेचे मतदान खुले होते. आता विधान परिषदेसाठी गुप्त मतदान आहे. या गुप्त मतदानामुळे मतांची फाटाफूट आणि क्रॉस व्होटिंग होणार का, अशी चर्चा होत आहे. त्याचबरोबर पडद्याआडच्या अर्थपूर्ण घडामोडींना जोरदार वेग आल्याचीही चर्चा आहे.

SCROLL FOR NEXT