Latest

विधान भवनातून… शेतकर्‍यांना वाली कोण?

मोहन कारंडे

अधिवेशनाच्या तिसर्‍या आठवड्याचा पहिला दिवस सुरू झाला तोच विरोधकांच्या आंदोलनाने! राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचा सत्यानाश झाला आहे. कापूस, कांदा, द्राक्ष अशा सर्वच पिकांची या पावसाने वाट लावली आहे. शेतकर्‍यांच्या या दुःखाला वाचा फोडण्यासाठी विरोधक खराब झालेल्या पिकांचे नमुने घेऊन सोमवारी विधानभवनात पोहोचले. गेल्या आठवड्यातही असेच आंदोलन करीत सरकारविरोधात घोषणाबाजी केली गेली होती. आजही त्याचीच पुनरावृत्ती झाली.

सोमवारची महत्त्वाची घडामोड म्हणजे सरकारी कर्मचार्‍यांचा संप मिटला! स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी महासंघाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली आणि संघटनांनी संप मागे घेतला. जुन्या पेन्शनचे तत्त्व सरकारला मान्य असून, त्यावर विचार करण्यासाठी एक समिती नेमण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आणि संप मागे घेतला गेला. शिंदे यांचे हे मोठे यश आहेच; मात्र राज्यभरातून सरकारी कर्मचार्‍यांविरोधात मोठ्या प्रमाणात जनमत तयार होत होते. या रेट्याचाही परिणाम संप मागे घेण्यावर झाला असावा!

शेतकर्‍यांच्या नुकसानीचा विषय विधानसभेत सोमवारी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केला. गारपिटीमुळे शेती आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिकांबरोबर शेतकरीदेखील आडवा झाला आहे, याकडे पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले. सरकारी कर्मचारी सात दिवसांपासून संपावर असल्याने पिकांच्या नुकसानीचे पंचनामेदेखील झालेले नाहीत, त्यामुळे आजच्या आज नुकसानभरपाईची रक्कम जाहीर करून वाटप सुरू करावे, अशी मागणी पाटील यांनी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सरकारबद्दल संताप व्यक्त करून अध्यक्षांनी आदेश दिले तरच सरकार वठणीवर येईल, असे सांगितले.

कांदा उत्पादक, कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकर्‍यांना एक रुपयात पीक विमा योजना सरकार आणत आहे; पण विम्याचे हप्ते भरण्यास शेतकर्‍याने कधीच नकार दिलेला नव्हता. त्यांचा आक्षेप जाचक अटींबाबत आहे. या जाचक अटी दुरुस्त करण्याची गरज आहे. यामुळे शेतकरी विम्याच्या विरोधात आहेत. आता एक रुपया भरून विमा घेणार्‍या शेतकर्‍यांना विमा कंपन्या दारातच उभे करणार नाहीत. त्यामुळे सरकारची भूमिका शेतकर्‍याला फसवणारी आहे, असा जोरदार हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.

शेतकर्‍यांच्या नुकसानीचा अंदाज अजून नीट आलेला नाही. काही भागांत अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे नुकसानभरपाई द्यायची असेल, तर पंचनामे व्हायला हवेत. ते करणारे कर्मचारी कामावर यायला हवेत. अखेर आज संप मिटला असल्याने लगेच काम सुरू होईल आणि बळीराजाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही!

राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील अनेकदा सरकारची लक्तरे काढत असतात. गोड गोड बोलून बोचकारे काढण्याची त्यांची पद्धत आहे. आज त्यांनी देवस्थानच्या जमिनीच्या विषयावरून असेच सरकारला धारेवर धरले. राज्यभर हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट सुरू असून, या जमिनी हडप करण्याचे षड्यंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे, असा गंभीर आरोप पाटील यांनी केला. या घोटाळ्यांची माहितीच त्यांनी कागदपत्रांसह सादर केली. या घोटाळ्यांमागे कोण राजकीय नेते आणि अधिकारी आहेत आणि याचा फायदा कोणाला झाला, असा सवाल पाटील यांनी केला.

बाकी आज सभागृहात तशी शांतताच होती. रविवारी खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला झालेली गर्दी आज विधानभवनात चर्चेचा विषय होता. आता उद्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा मुंबईत आणि उद्धव ठाकरे यांची सभा मालेगावात होणार आहे. या सभांना किती गर्दी जमते व त्यात हे नेते जनतेला काय संदेश देतात, याबद्दल उत्सुकता आहे.

– उदय तानपाठक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT