Latest

विधान परिषदेतून : वळसे-पाटील पायऱ्यांवर उतरलेच!

मोहन कारंडे

चंदन शिरवाळे : विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आणि एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून प्रतिमा जपणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील हे सभागृहात कितीही गोंधळ झाला आणि गदारोळ झाला तरी कधी त्यात सामील झाले नाहीत. कधी वेलमध्ये आले नाहीत की कधी पायऱ्यांवर निदर्शने करताना दिसले नाहीत. पण शुक्रवारी ते विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरलेच! ते सरकारच्या विरोधात काळ्या फिती लावून घोषणा देतानाही दिसले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सभागृहातून निलंबित करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दुसऱ्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आक्रमक झालेले दिसले. विरोधी पक्ष नेते अजित पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे • बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासह दिलीप वळसे- पाटीलही पायऱ्यांवर निदर्शने करताना दिसले. पण वळसे-पाटील यांची पायऱ्यांवरील निदर्शने लक्षवेधी ठरली. विधानसभा अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर कधी वेलमध्ये की पायऱ्यांवर न उतरलेले वळसे – पाटील आज पायऱ्यांवर कसे काय आले, याची चर्चा सुरू झाली. परंतु त्याला माझी विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले हे कारणीभूत ठरले. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष होते. नंतर त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. परंतु, महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर नाना पटोले सरकार विरोधात सतत आक्रमक दिसतात. पटोले हे वेलमध्ये उतरत असून विधान भवनाच्या पायऱ्यांवरही सातत्याने दिसत आहेत.

शुक्रवारी जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी पायऱ्यांवर आंदोलन करत होती तेव्हा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी नाना पटोले हे जर विधानसभा अध्यक्ष राहिल्यानंतरही पायऱ्यांवर आंदोलन करत असतील तर तुम्हाला आंदोलन करायला काय हरकत आहे, असा सवाल वळसे-पाटील यांना केला. हे लॉजिक त्यांनाही पटले आणि ते देखील पायऱ्यांवर आंदोलनाला तयार झाले. चांगले तासभर ते पायऱ्यांवर बसून घोषणा देत होते.

उपाध्यक्षांना आसन मिळेना!

हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा संपला असला तरी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना काही विधानसभेच्या आसनावर बसण्याची आणि कामकाज चालविण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे झिरवाळ उपाध्यक्ष असले तरी त्यांच्या नशिबी सभासन नसल्याचे सध्या चित्र आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधानसभेच्या आसनावर बसून जास्तीत जास्त कामकाज चालवत आहेत. गरज असेल तेंव्हा ते उपाध्यक्षाऐवजी तालिका अध्यक्षांकडूनच काम करून घेत आहेत. विधानसभा आसनावर बसण्याची तालिका अध्यक्ष समीर कुणावर, संजय शिरसाट यांना संधी मिळत असली तरी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ अजूनही प्रतीक्षेत आहेत. आपल्याला काही संधी मिळत नाही हे पाहून काहीवेळा ते सभागृहातील जागेवर बसून कामकाज पाहात आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तातडीने विधानसभा अध्यक्ष बदलण्याची खेळी शिंदे-फडणवीस सरकारने केली. या आसनाचे महत्त्व सर्वश्रुत असल्याने ही खेळी करण्यात आली आणि ती शिंदे-फडणवीस सरकारच्या पथ्यावरही पडली. त्यांना घटनात्मक पेच प्रसंगात पुढचे झपे टाकणे सोपे गेले. मात्र, उपाध्यक्षपदी नरहरी झिरवाळ हेच सद्यातरी कायम आहेत. पण ते विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्याने ते उपाध्यक्ष असूनही सभेच्या आसनापासून वंचित आहेत असे चित्र आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT