विधान परिषद निवडणुकीचा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे ( विधान परिषद निवडणूक ). त्याची झलक बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिसली. उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान पाटील आणि महाडिक गट आमने-सामने आले. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या घोषणाबाजीने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी संयमाने दोन्ही गटांना बाजूला नेत वातावरण शांत केले.
भाजपचे उमेदवार अमल महाडिक ( विधान परिषद निवडणूक ) यांच्यासह माजी खासदार धनंजय महाडिक, माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक सत्यजित कदम आदींसह महाडिक समर्थक सकाळी पावणेअकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आले. मात्र, उमेदवारांसह सूचक, उमेदवारांचा निवडणूक प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाईल, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांनी उमेदवार आणि त्यांचे सूचक, प्रतिनिधी वगळता सर्वांना कार्यालयाच्या आवाराबाहेर काढले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर महाडिक समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली ( विधान परिषद निवडणूक ). दरम्यान, काही वेळातच सतेज पाटील यांचे समर्थकही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल होऊ लागले. पाटील समर्थक रस्त्याच्या दुसर्या बाजूला महावीर उद्यानाच्या भिंतीकडेला थांबले. एका गटाकडून घोषणा सुरू झाली की, दुसर्या गटाकडून त्याला प्रत्युत्तर म्हणून घोषणाबाजी सुरू होत होती. पोलिस दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत होते.
सकाळी 11 वाजता छाननीला प्रारंभ झाला. अमल महाडिक यांनी, सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्जात कसबा बावडा येथील रि.स.नं. 548/2 या मिळकतीची माहिती सादर केली नाही. ताराराणी चौक येथील मिळकतीचे चुकीचे क्षेत्र आहे. रि.स.नं.2104 हिस्सा नं. 15 आणि डी.वाय.पी. सिटी मॉलमधील लिव इन लायसेन्स करारपत्र सादर केलेले नाही. कॉसमॉस बँकेच्या कर्ज प्रकरणाची माहिती दिलेली नाही. सि.स.नं.2104 हिस्सा नं. 15 या मिळकतीचा महापालिका मालमत्ता कर थकीत आहे, त्याबाबत माहिती दिलेली नाही. या मिळकतीच्या करारपत्र, संमतीपत्राची 54 लाख 29 हजार रुपयांची दंड स्वरूपातील रक्कम दाखविलेली नाही, असे सात आक्षेप घेतले.या आक्षेपातील सर्व मुद्दे प्रतिज्ञापत्रात लपवणे आणि शासकीय देणी थकीत असणे या स्वरूपातील असल्याने त्यांनी सांगितले.
त्यावर सतेज पाटील यांच्या वतीने उपस्थित वकील आणि प्रतिनिधींने भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनूसार यापैकी पहिले चार मुद्यांची माहिती लपवणे हे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्याचे कारण होऊ शकत नाही तसेच याबाबत उपस्थित मुद्दे खरे की खोटे हे तपासणीचेही कारण नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर महाडिक यांच्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयाचा 784/2015 चा निकाल सादर करत मालमत्ता आणि उत्पन्नाचे स्त्रोत लपवून ठेवणे हे उमेदवाराने भ—ष्ट मार्गाने केलेले उत्पन्न समजण्यात यावे असे नमूद आहे. त्यानूसार लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 8 (अ) नूसार हा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यास पात्र असल्याचा तोंडी आक्षेप नोंदवला.
त्यावर पुन्हा पाटील यांच्या वकीलांनी तोंडी म्हणणे सादर करत लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 99 अंतर्गंत आदेश झाल्यानंतर कलम 8 (अ) लागू केले जाते. सदरचे कलम 8 (अ) लागू करण्यासाठी कोणतेही आदेश नाहीत, यामुळे हा आक्षेप फेटाळण्यात यावा असे सांगितले.
दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी रेखावार यांनी कायद्यातील सर्व तरतूदी पाहता घेतलेले आक्षेप गैरलागू होत असल्याचे सांगत हे सर्व आक्षेप फेटाळून लावले. याबाबतचा लेखी आदेश दुपारी देण्यात आला.
दरम्यान दुपारी सव्वा बाराच्या सुमारास अमल महाडिक जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले. ते बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या घोषणा सुरू केल्या. यामुळे पाटील गटात काहींशी शांतता पसरली. दरम्यान पाटील यांचे कार्यकर्ते खोत यांनी येऊन सर्व आक्षेप फेटाळले असून अर्ज वैध ठरल्याचे सांगितल्यानंतर पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाटील समर्थकांना उद्योग भवनच्या दिशेने तर महाडिक समर्थकांना महावीर महाविद्यालयाच्या दिशेने घालवले. यानंतर काही वेळातच वातावरण शांत झाले.
यावेळी पाटील गटाचे गोकुळचे संचालक बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, माजी नगरसेवक राजू लाटकर, सुनिल मोदी, विनायक फाळके, विनायक सुर्यंवशी, भरत रसाळे, गणी आजरेकर, महादेव नरके आदी तर महाडिक गटाचे माजी नगरसेवक विजय सुर्यवंशी, सुनिल कदम, सत्यजित कदम, पृथ्वीराज महाडिक, रहीम सनदी, सचिन तोडकर आदी उपस्थित होते.
सुमारे दीड तास युक्तिवाद ( विधान परिषद निवडणूक )
महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याबाबत विरोधी भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी हरकत घेत त्यांचा अर्ज अवैध ठरविण्याची मागणी केली. त्यावर सुमारे दीड तास झालेल्या युक्तिवादानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांनी महाडिक यांची हरकत फेटाळून लावत पाटील यांचा अर्ज वैध ठरविला. पाटील यांच्यासह अमल महाडिक यांचाही अर्ज वैध ठरला आहे.
जोरदार घोषणाबाजीने तणाव ( विधान परिषद निवडणूक )
दोन्ही बाजूंना दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने आणि मध्यभागी पोलिसांचा फौजफाटा, असे चित्र काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर होते. दोन्ही बाजूंनी कार्यकर्ते मोबाईलवरून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील परिस्थिती अन्य कार्यकर्त्यांना सांगत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांची संख्या वाढतच चालली होती. जसजशी कार्यकर्त्यांची गर्दी वाढत गेली, तसा तणावही वाढत गेला. कार्यकर्ते विरोधी गटातील कार्यकर्त्यांकडे पाहत त्वेषाने घोषणा देत होते.