Latest

विधवा, घटस्फोटित महिलांना लग्नाचे आमिष दाखवून अडीच काेटींना लुटले

Arun Patil

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : विवाह जुळवणार्‍या मॅट्रिमोनियल साईटवर फेक प्रोफाइल बनवून विधवा व घटस्फोटित अशा 26 महिलांचे आर्थिक व लैंगिक शोषण केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला असून, प्रजित जोगीश केजे ऊर्फ प्रजित तयल खलीद ऊर्फ प्रजित टिके (वय 44, रा. माही, पाँडिचेरी) या भामट्यास कापूरबावडी पोलिसांनी ठाण्यातच गजाआड केले.

या महिलांची झालेली फसवणूक अडीच कोटींच्या घरात असून, या भामट्यास ठाणे न्यायालयाने 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून आणखी काही फसवणुकीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस उपायुक्‍त डॉ. विनयकुमार राठोड यांनी बोलून दाखवली.

कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ढोकाळी येथे राहणार्‍या एका महिलेने विवाह जुळवणार्‍या वेबसाईटवर नोंदणी केली होती. याच वेबसाईटच्या माध्यमातून प्रजित टिके याने या महिलेशी विवाह करण्याची तयारी दर्शवली. तो थेट ठाण्यात आला. पॅरिस येथे माझे स्वतःचे हॉटेल असल्याची बतावणी त्याने केली. त्याच्या भूलथापांना ही महिला बळी पडली. चांगले स्थळ असल्याची समजूत झाल्याने या महिलेने त्याच्याशी ओळख वाढवली.

याच दरम्यान, भामट्याने लग्‍नाचे आमिष दाखवून या महिलेचे शारीरिक शोषण करण्यास सुरुवात केली. माझे पॅरिस येथील हॉटेल मी विकले आहे. त्याची मोठी रक्‍कम बँकेत अडकली आहे. ही रक्‍कम परत मिळवण्यासाठी मला पैशांची अत्यंत गरज आहे, माझी रक्‍कम मिळाली की मी तुला दुप्पट पैसे देईन, अशी थापेबाजी त्याने केली. त्यानंतर या ठगाने महिलेकडून तब्बल 16 लाख 86 हजार 999 रुपये इतकी रक्‍कम उकळली.

पैसे मिळताच तिच्याशी संपर्क तोडला. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने कापूरबावडी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्यावर नजर रोवून त्याच्या लोकेशनवर लक्ष ठेवले. अचानक हा भामटा पुन्हा ठाण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कापूरबावडी पोलिसांनी त्यास ठाण्यातील एका लॉजवर गेल्या 11 डिसेंबर रोजी गाठले आणि अटक केली.

26 महिलांची अडीच कोटींची फसवणूक

* या भामट्याने आपल्या एकेक गुन्ह्यांची कबुली दिल्याचे समजते. तब्बल 26 महिलांना लग्नाचे आमिष दाखवत आणि पॅरिस येथील हॉटेल विक्रीचे कारण सांगून त्यांच्याकडून 2 कोटी 58 लाख रुपये उकळले.

* हा भामटा विवाह जुळवणार्‍या मॅट्रीमोनियल साईटवर फेक प्रोफाइल तयार करायचा आणि त्यावरून विधवा व घटस्फोटित महिलांना हेरत असे. या महिलांशी ओळख वाढवून त्यांना पॅरिस येथे स्वतःचे हॉटेल असल्याची बतावणी करायचा. गोड बोलून महिलांचे मन जिंकले की मग त्यांचे लैंगिक शोषण करत असे.

* मी माझे हॉटेल विकले असून त्यातून मिळालेली मोठी रक्कम आरबीआयमध्ये अडकली आहे, अशी कहाणी तो ऐकवत असे. तुम्ही मला ही रक्कम परत मिळवण्यासाठी आर्थिक मदत केलीत तर तुम्हाला दुप्पट पैसे देईन असे आमिष तो दाखवत असे.

* अशा प्रकारे मुंबई, केरळ, कोलकाता, बेंगलोर आदी ठिकाणच्या 26 हून अधिक महिलांची त्याने फसवणूक केली, अशी माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.

SCROLL FOR NEXT