Latest

विजय वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी महामंडळाच्या कर्ज वसुलीस स्थगिती

Arun Patil

कराड ; पुढारी वृत्तसेवा : ओबीसी समाजाच्या महामंडळांची कर्ज वसुली आजपासून स्थगित करत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी कराड येथे केली.

दरम्यान, ओबीसींसाठीची कर्ज मर्यादा 10 लाखांवरून 20 लाखांपर्यंत, कटगुण येथे महात्मा फुले यांच्या भव्य स्मारकासाठी 25 कोटींपर्यंत मदत देण्याबरोबर सातारा जिल्ह्यात ओबीसींचे क्लस्टर सुरू करण्यासाठी 15 कोटींपर्यंत मदत व ओबीसी समाजासाठी महात्मा फुले घरकुल योजना आणणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचा भव्य मेळावा येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये झाला, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण होते.

यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. उदयसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, युवक प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे, हिंदुराव पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, अजित पाटील चिखलीकर, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना यादव,अ‍ॅड. पल्लवी रेणके, विद्याताई थोरवडे, नगरसेवक फारूक पटवेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ना. विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढू पण आरक्षण मिळवू असे सांगत ओबीसी समाजाला धीर दिला. ते म्हणाले, देशात 378 जाती आहेत. यातील 33 जातींकडे स्वतःची घरे नाहीत. ते झोपडीत रहात आहेत. यामध्ये ओबीसी समाजाचाही समावेश आहे. या समाजाला न्याय देण्यासाठी विधीमंडळात सातत्याने आवाज उठविला आहे. ओबीसींचे नोकरीतील आरक्षण टिकण्यासाठी प्रयत्न केले. याच प्रमाणे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून घेण्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई लढू. यासाठी वेळ प्रसंगी माझी प्रतिष्ठा बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाय धरेण, पण माझ्या ओबीसी समाजाला न्याय मिळवून देईन.

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यात चांगले काम सुरू आहे. हे सरकार पाच वर्षे टिकेल. सरकार पाडण्यासाठी विरोधकांकडून वेगवेगळे मार्ग अवलंबले जात आहेत. पण आम्ही याला तोंड देत एकत्रीत काम करत आहोत. मित्र पक्षांकडून काही चुका होत आहेत, पण यातून आम्ही सामोपचारातून मार्ग काढू.

राष्ट्र संत तुकडोजी महाराज, संत तुकाराम, संत गाडगेबाबा यांनी माणूस जोडण्यासाठी आयुष्य वेचले. पण सध्या विशिष्ट विचारसरणी घेऊन काम करणारे तथाकथीत संत समाजात दुही निर्माण करत आहेत. यांच्या पासून समाजाने सावध राहिले पाहिजे. या संतांचे कारणामे देश पहात आहे. काही संत आज तुरूंगात आहेत.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यात भाजप सत्तेत असताना त्यांच्याकडून विरोधी पक्षाला संपवून टाकण्याचे काम झाले. मात्र भाजपला दूर ठेवून राज्यात अस्तित्वात आलेले महाविकास आघाडीचे सरकार हे सध्याची टर्म पूर्ण करुन पुढचे पाच वर्षे सरकार टिकेल. यापुढच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून झाल्यास भाजपला सत्तेपासून दुर रहावे लागेल. 1994 साली ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांत 27 टक्के राजकीय आरक्षण दिले.

मात्र आज काही तांत्रीक कारणामुळे 27 टक्के आरक्षण संपुष्टात आले आहे. महात्मा फुलेंच्या कटगुणला होणार्‍या स्मारकाच्या विकासासाठी मी पाठपुरावा करणार आहे. भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना मान्य नाही. त्यांना वर्णाश्रमावर आधारीत व्यवस्था निर्माण करायची आहे. देशाची अर्थव्यवस्था टोकाच्या संकटावर आहे. देशाची श्रीलंकेसारखी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही. देशाला वाचवण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही.

काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी म्हणाले, काँग्रेसची विचारधारा ही देशहिताची आहे. त्यामुळे काँग्रेस देशात पुन्हा उभारी घेईल. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गंडांतर आले आहे. केंद्र सरकारने खोडसाळपणा केल्याने ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण द्या, म. फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे यांना भारतत्न जाहीर करा, जातनिहाय जनगणना करा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मेळाव्यास ओबीसी सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT