Latest

विक्रम गोखले यांचे ‘ते’ कोल्हापुरातील अखेरचे नाटक ठरले

Arun Patil

कोल्हापूर, सचिन टिपकुर्ले : केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये 'बॅरिस्टर' नाटकाचा प्रयोग सुरू होता. अचानक साऊंड सिस्टीम खराब झाली. प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्रकाराने विक्रम गोखले चांगलेच संतापले. त्यांनी नाटकाचा शो मध्येच बंद केला. जोपर्यंत या नाट्यगृहातील साऊंड सिस्टीम तसेच अन्य सुविधा सुरू होत नाहीत, तोपर्यंत नाटक करणार नाही, अशी त्यांनी शपथ घेतली होती. दुर्दैवाने ते त्यांचे अखेरचे नाटक ठरले. यानंतर कोल्हापुरात त्यांचा नाटकाचा कधीच प्रयोग झाला नाही.

केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा इतिहास आहे. दिग्गज कलाकारांनी या रंगभूमीवर आपली कला सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. 2009-10 साली विक्रम गोखले हे रंगभूमीवर बर्‍यापैकी नाटकाचे प्रयोग करत होते. तेव्हा 'बॅरिस्टर' या नाटकाचा कोल्हापुरात प्रयोग होता. गोखले यांचा अभिनय पाहण्यासाठी नाट्यगृह गर्दीने फुलून गेले होते. त्यावेळेस केशवराव भोसले नाट्यगृहात फारशा सुविधा नव्हत्या. नाट्यगृहात असणारे पंखे देखील बंद होते.

बॅरिस्टर नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच कलाकारांचे संवाद प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नव्हते. त्यामुळे प्रेक्षकांची चुळबुळ सुरू झाली. साहजिकच विक्रम गोखले यांच्या ही बाब लक्षात आली. नाटक सुरू असतानाच ते मध्येच थांबले आणि प्रेक्षकांना विचारलं, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नाही का? तेव्हा प्रेक्षकांनी 'नाही, माईक प्रॉब्लेम आहे', असे सांगितले. त्यावेळी कोणतीही नाट्य संस्था स्वतःची अशी साऊंड सिस्टीम आणत नव्हती. आहे त्या साऊंड सिस्टीमवर नाटक करण्याची तडजोड विक्रम गोखले यांना मान्य नव्हती. त्यांनी नाट्यगृहाची जबाबदारी असणार्‍या महापालिकेवर ताशेरे ओढले. आमच्याकडून भाडे घेता, पण तशा सुविधा देत नाही. नाट्यगृहाचे पैसे नेमके जातात तरी कुठे, असा सवाल उपस्थित केला. अशा स्थितीत काम करणे शक्य नाही, असे सांगून नाटकाचा प्रयोग बंद करत असल्याचे जाहीर केले.

त्यांनी तत्काळ नाट्यगृहाचा फेरफटका मारला. नाट्यगृहात प्रेक्षकांसाठी पाण्याची सुविधा नाही, टॉयलेट सरळ नाहीत, खुर्च्यांची दुरास्था यामुळे विक्रम गोखले नाराज झाले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले, जोपर्यंत या नाट्यगृहामध्ये चांगल्या सुविधा दिल्या जात नाहीत, तोपर्यंत येथे प्रयोग करणार नाही. त्यांच्या भूमिकेमुळे अखेर महापालिका प्रशासनालाही नमते घ्यावे लागले. महापालिकेने तत्काळ सुविधा देण्याचे मान्य केले. आज नाट्यगृहाचे जे अंतर्गत रूप पालटले आहे, ते फक्त आणि फक्त विक्रम गोखले यांच्यामुळेच.

गोपाळ खेर यांच्याकडे 'वाहतो दुर्वांची जोडी' नाटकाचे रेकॉर्डिंग. बालगंधर्व, किशोरी अमोणकर यांच्या गायनाच्या जुन्या कॅसेट होत्या. हे गाणे ऐकण्यासाठी जेव्हा जेव्हा विक्रम गोखले कोल्हापुरात यायचे, तेव्हा ते गोपाळ खेर यांची आवर्जून भेट घेत होते.

'बॅरिस्टर' तसेच 'वाहतो दुर्वांची जोडी' या नाटकात काम सुरू असताना दत्ता माने यांच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी याच कोल्हापुरातून विक्रम गोखले यांना मिळाली. कमलाकर तोरणे यांच्या चित्रपटातही त्यांनी काम केले. गेल्या काही वर्षांपासून तब्येत साथ देत नसल्यामुळे ते कोल्हापुरात येत नव्हते. पण आल्यानंतर बादशहा लॉजचे मालक शशिकांत जोशी यांची ती आवर्जून भेट घेत होते. गोखले यांच्या निधनाचे वृत्त समजतात जोशी यांनी 'एक चांगला मित्र हरपला', अशी भावना व्यक्त केली. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनीही मराठी व हिंदी चित्रपटातील एक चांगला कलाकार हरपला आहे, ही पोकळी कधी भरून निघणार नाही, असे सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT