Latest

वारणा दूध संघाची गाय दूध खरेदी दरात 3, तर म्हैस दरात 2 रुपये वाढ

Arun Patil

वारणानगर, पुढारी वृत्तसेवा : वारणा दूध संघ शेतकर्‍यांना गायीच्या खरेदी दुधास प्रतिलिटर 3 रुपये तर म्हैस दूध खरेदीस प्रतिलिटर 2 रुपये दरवाढ देण्याची घोषणा संघाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केली. ही दरवाढ शुक्रवार, दि. 21 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेे.

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर ही दरवाढ मिळाल्याने दूध उत्पादक शेतकर्‍यांतून समाधानाचे वातावरण आहे. यावेळी बोलताना डॉ. विनय कोरे यांनी राष्ट्रीय स्तराबरोबरच जागतिक बाजारपेठेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढली असून त्याचा पुरवठा करण्याचा संघ प्रयत्न करत आहे. गेले अनेक दिवस दूध उत्पादकांना वैरण टंचाईसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांना आर्थिक झळ बसू नये म्हणून वारणा दूध संघाने विविध योजनांद्वारे शेतकर्‍यांना पाठबळ दिले आहे. वेळोवेळी संघाने वर्षभरात गाय दुधाला 9 रुपये तर म्हैस दुधास 8 रुपये दरवाढ दिली आहे.

सध्या संघाच्या दूध व दूध पावडरला मागणी वाढत असून दही, लस्सी, ताक, श्रीखंड, आम्रखंड या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे डॉ. कोरे म्हणाले.

संघाने दीड लाखांवर जनावरांना मोफत लम्पी स्किन प्रतिबंधक लस दिली असून अमृत पशुधन सुरक्षा कवच योजनेतूंन 30 लाख रुपयांचे अनुदान दूध उत्पादकांना दिले आहे. अल्पदरात पशुवैद्यकीय सेवा व रेडी संगोपन उपक्रम राबविले जात असल्याचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले.

संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, अकौंटन्स मॅनेजर सुधीर कामेरीकर, संकलन व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील, मार्केटिंग इनचार्ज अनिल हेर्ले आदी यावेळी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT