Latest

वारंवारची सर्दी दुर्लक्ष नको

backup backup

वारंवार सर्दी होणे हा आजकाल खूप जास्त प्रमाणात दिसणारा त्रास आहे व त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वारंवार सर्दी होणार्‍या लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच अशा सर्दीकडे दुर्लक्ष न करता त्याची योग्य ट्रीटमेंट करणे आवश्यक आहे.
वारंवारच्या सर्दीचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अ‍ॅलर्जीमुळे होणारी सर्दी. बदलती जीवनशैली, खाण्याच्या सवयी व वाढते प्रदूषण यामुळे अ‍ॅलर्जीचे प्रमाण वाढत आहे अ‍ॅलर्जीमध्ये अनुवंशिकता हासुद्धा महत्त्वाचा घटक असतो.

अ‍ॅलर्जीच्या सर्दीची लक्षणे- यामध्ये वारंवार नाक गळणे म्हणजे नाकातून पाणी येणे, नाक गच्च होणे, शिंका येणे व नाकाला खाज येणे ही महत्त्वाची लक्षणे असतात. याचबरोबर इतर लक्षणे म्हणजे डोळ्यात पाणी येणे, डोळे लाल होणे, डोकेदुखी, कानदुखी, कान गच्च होणे, रात्री झोप न लागणे, अशक्तपणा येणे, दिवसा झोप येत राहणे, टाळ्याला खाज येणे, यातीलही काही त्रास असू शकतात. तसेच या पेशंटमध्ये डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे, वारंवार नाकाला हात लावणे, तोंड उघडे राहणे, नाकामधील मांस म्हणजेच हाड वाढणे, सायनसचा त्रास होणे, अडेनोईडच्या ग्रंथी वाढणे व त्यामुळे जास्त प्रमाणात घोरणे याही गोष्टी दिसतात. अ‍ॅलर्जीची सर्दी असणार्‍यांना पुढे अस्थमा होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

अ‍ॅलर्जीच्या सर्दीच्या पेशंटला कोणत्या गोष्टीमुळे त्रास वाढतो : यामध्ये ट्रिगर्स व अ‍ॅलर्जेन असे प्रकार आहेत.
अ‍ॅलर्जेन – म्हणजे ज्या वस्तूची अ‍ॅलर्जी असते. उदा. 1) धूळ – कारपेट, गादी, सॉफ्ट टॉइज यावरील धूळ. धान्यावरील धूळ 2) घरातील ओल्या भिंतीवरील बुरशी. 3) हवेतील परागकण. 4) प्राण्यांच्या अंगावरील लव.

ट्रीगर्स – म्हणजे या वस्तूची अ‍ॅलर्जी नसते; पण या वस्तूमुळे त्रास वाढतो.
उदा. धूर – अगरबत्ती, सिगारेट, स्टोव्ह, लाकूड, शेणकूट, तंबाखू यांचा धूर, खडूची पावडर, टाल्कम पावडर, स्ट्रॉग परफ्यूम, बॉडी स्प्रे.
अ‍ॅलर्जीची सर्दी असणार्‍यांनी वरील सर्व गोष्टी टाळाव्यात.

नेहमीची सर्दी वा अ‍ॅलर्जीची सर्दी यामध्ये कशाप्रकारे फरक करता येईल –
नेहमीची सर्दी ही व्हायरल इन्फेक्शन व वातावरणातील बदलांमुळे होऊ शकते. ती पाच-सात दिवसांमध्ये बरी होऊन जाते परंतु अ‍ॅलर्जीची सर्दी मात्र खूप दिवस राहते औषध घेतल्यावर ती कमी होते पण औषधे बंद केल्यानंतर पुन्हा चालू होते व ती फारच वारंवार होत असते
नेहमीच्या सर्दीबरोबर ताप किंवा अंगदुखी अशी लक्षणे दिसू शकतात परंतु अ‍ॅलर्जीच्या सर्दीमध्ये ही लक्षणे दिसत नाहीत. अ‍ॅलर्जीची सर्दी ट्रिगर्स व अ‍ॅलर्जेनच्या पसरण्याने वाढतात.

अ‍ॅलर्जीचे निदान करणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण नक्की कशाची अ‍ॅलर्जी आहे हे कळले तर ती गोष्ट टाळणे शक्य होते. अ‍ॅलर्जीच्या निदानामध्ये अ‍ॅलर्जी स्किन प्रिक टेस्ट ही सर्वात महत्त्वाची टेस्ट आहे. यामध्ये नक्की कशाची अ‍ॅलर्जी आहे ते कळते. ही टेस्ट वेदनारहीत व रक्तस्रावविरहित आहे. या टेस्टमध्ये त्वचेत छोटासा प्रिक करून त्याचा रिझल्ट पाहिला जातो व ही टेस्ट अर्ध्या तासात पूर्ण होते. टेस्टमधून मिळालेले अ‍ॅलर्जेन आपण टाळू शकतो आणि टाळणे शक्य नसल्यास त्या अ‍ॅलर्जेनची ट्रिमेंट केली जाऊ शकते. अ‍ॅलर्जी अस्थमाच्या रुग्णांनी स्वतःला वाटते म्हणून कोणतीही अ‍ॅलर्जी टेस्ट करू नये. त्याचा उपचारामध्ये कोणताही फायदा होत नाही. योग्य अ‍ॅलर्जी स्पेशालिस्टचा सल्ला घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य टेस्ट व ट्रीटमेंट करावी. काहीवेळा अ‍ॅलर्जी स्किन प्रिक टेस्ट करता येणे शक्य नसते. अशावेळी आपण ब्लड टेस्ट करू शकतो. वारंवारच्या सर्दीमुळे नाकामधील हाड वाढणे किंवा सूज येणे या तक्रारी असतील तर याचे निदान करण्यासाठी नेजल एन्डोस्कोपी चा उपयोग होऊ शकतो.

डॉ. साईनाथ पोवार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT