Latest

वाघ, बिबटे गावालगत येताच कळणार; ताडोबात अलर्ट सिस्टीम कॅमेरे; देशातील पहिलाच प्रयोग

मोहन कारंडे

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे मानवावरील हल्ले नित्याचे आहेत. त्यावर उपाय म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सीतारामपेठ गाव संकुलात सुमारे २० अलर्ट सिस्टीम कॅमेरे लावण्यात येणार आहेत. ही माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.

गावालगतचे हे कॅमेरे इंटरनेटशी जोडले जातील. वाघ, बिबट्या या वन्यप्राण्यांचा वावर दिसताच ताडोबा प्रशासनाकडून तत्काळ गावकऱ्यांना सतर्क केले जाईल. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगण्यात येते. प्रयोग यशस्वी झाल्यास इतर गावांतही अलर्ट सिस्टीम कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

१५ मार्चपर्यंत अलर्ट सिस्टीम कॅमेरे कार्यान्वित होतील.
८५ हून अधिक वाघ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहेत.
२७ वाघ कोअर क्षेत्रात, ३४ बफर क्षेत्रात, अन्यत्र २४ वाघ.
२५ लाख रुपये अलर्ट सिस्टीमवरील खर्च.
१२५ हून अधिक बिबटे आहेत.

SCROLL FOR NEXT