Latest

वरद पाटीलच्या मारेकर्‍याला फाशीच द्या : माहिलांनी तीन तास ठिय्या

Arun Patil

मुरगूड ; पुढारी वृत्तसेवा : सोनाळी (ता. कागल) येथील वरद रवींद्र पाटील या सातवर्षीय बालकाचा खून नसून नराधम दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य याने नरबळीच दिला आहे. याची सखोल चौकशी व्हावी व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी शनिवारी सावर्डे व सोनाळीच्या संतप्त ग्रामस्थांनी मुरगूड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. हजारो माहिलांनी तीन तास ठिय्या आंदोलन करून निषेधाच्या घोषणा दिल्या.

संशयित दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य (रा. सोनाळी) याने स्वत:ला मूल होत नसल्याने वरदचे अपहरण करून नरबळी दिल्याचा दाट संशय असून त्या दिशेनेच तपास व्हावा, नराधमाला फाशीची शिक्षा होईल असा त्याच्यावर कडक गुन्हा दाखल करावा व विनाकारण बालकाच्या आईला कोणताही त्रास देऊ नये, यासाठी शनिवारी सोनाळी व सावर्डे या दोन्ही गावांतील नागरिकांनी हजारो महिलांसह निषेध फलक हातात घेऊन मुरगूड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.

पोलिस ठाण्यासमोर प्रचंड घोषणाबाजी

ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर येताच संताप व्यक्त करून प्रचंड घोषणाबाजी केली. मुरगूड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विकास बडवे यांनी ग्रामस्थांची समजूत काढत पोलिस तपास कामास मदत करण्याचे आवाहन केले; पण ग्रामस्थ ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. संतप्त जमाव पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडून असल्याचे समजताच अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे व पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला; पण जमाव त्यांनाही दाद देत नव्हता.

आरोपीच्या चुकीच्या जबाबानुसार पोलिस तपास सुरू आहे. विनाकारण वरद पाटीलच्या आईला यामध्ये गोवण्याचा प्रयत्न होत आहे. हा खून नसून नरबळीचाच प्रकार असून तसा तपास व्हावा, या मागणीवर ग्रामस्थ ठाम होते. महिलांचा आक्रोश व ग्रामस्थांच्या संतापाने पोलिस ठाण्यासमोर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यामुळे गांधीनगर व कागलहून पोलिसांची जादा कुमक मागवावी लागली. विशेष राखीव फोर्सही तैनात करण्यात आली.

हजारो महिलांचा तीन तास ठिय्या

हजारो महिलांनी पोलिस ठाण्यासमोरच तीन तास ठाण मांडून निषेधाच्या घोषणा दिल्या. ग्रामस्थ, सरपंच व सदस्य आक्रमक झाले होते. अखेर तीन तासांनंतर सोनाळीचे माजी सरपंच सत्यजित पाटील, सरपंच तानाजी कांबळे, सावर्डेचे माजी उपसरपंच प्रताप पाटील यांनी जमावासमोर येऊन पोलिसांकडून योग्य न्याय मिळेल.आरोपीला कठोर शिक्षा होईल, यासाठी आपण 'वेट अँड वॉच' करूया व या घटनेसंदर्भात अन्याय झाल्यास पुन्हा पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करू. प्रसंगी आत्मदहन करू, असे सांगितल्यानंतर संतप्त जमाव परतला.

विविध संघटनांकडून पोलिसांना निवेदन

आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, यासंदर्भात मुरगूड पोलिसांना अनेक संघटनांनी निवेदने दिली. त्यामध्ये सोनाळी, सावर्डे, बिद्री, भडगाव ग्रामपंचायत, कागल तालुका शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट, सोनाळी गावची सर्व तरुण मंडळे, महिला बचत गट यांचा समावेश होता.

तपासासाठी खास पथक कार्यरत

मुरगूड : सोनाळी (ता. कागल) येथील वरद पाटील याचा खून करणारा मुख्य आरोपी दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य याला न्यायालयात हजर केले असता गुरुवार, दि. 26 पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

या खून प्रकरणाच्या तपासासाठी जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, गडहिंग्लज विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे, करवीर विभागाचे पोलिस उपअधीक्षक आर.आर. पाटील व मुरगूडचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांचा समावेश असल्याचे समजते. हे पथक वेगाने तपास करीत असून खुनाचे कारण लवकरच स्पष्ट होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

तपासात वरदची आई व इतरांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे. त्यातून खुनाचे कारण उलगडण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहेत.

SCROLL FOR NEXT