Latest

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात ५३.७१ टक्के मतदान, त्रिपुरामध्ये सर्वाधिक तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी मतदान

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यात उष्णतेची लाट असूनही देशभर मतदान चांगल्या प्रमाणात आणि शांततेत पार पडले. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात १८ व्या लोकसभेसाठी १३ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर्वात जास्त मतदान त्रिपुरा (७७.९७%) येथे तर सर्वात कमी मतदान बिहारमध्ये (५३.०२%) पार पडले. तर महाराष्ट्रात ५३.७१ मतदान पार पडले. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात काहीसे कमी मतदान झाले. दरम्यान, पहिल्या टप्प्यातही त्रिपुरामध्ये सर्वाधिक मतदान झाले होते.

देशात १८ व्या लोकसभेसाठी मतदानाचा दुसऱ्या टप्पा शुक्रवारी (२६ एप्रिल) पार पडला. यामध्ये लोकसभेच्या ८८ जागांसाठी मतदान झाले. या ८८ जागांमध्ये महाराष्ट्रात विदर्भातील वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ- वाशिम, बुलढाणा या पाच मतदारसंघात तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या तीन अशा एकुण ८ मतदारसंघांचा समावेश आहे. केरळमधील सर्व २० लोकसभा मतदारसंघात आज मतदान झाले. याशिवाय बिहार – ५, कर्नाटक -१४, राजस्थान -१३ उत्तरप्रदेश -८, मध्य प्रदेश-६, आसाम -५, छत्तीसगड -३ पश्चिम बंगाल-३ मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मिरातील एका जागेवरही मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यात आधी ८९ मतदारसंघात मतदान पार पडणार होते. मात्र, मध्यप्रदेशातील बैतुल लोकसभा मतदारसंघातील बसपा उमेदवाराचे निधन झाल्यामुळे येथील मतदान लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्या जागेवर आता तिसऱ्या टप्प्यात ७ मेला मतदान होणार आहे.

शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली. मात्र या टक्केवारीत बदल होऊ शकतो असेही आयोगाच्या वतीने सांगण्यात आले. काही ठिकाणी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. त्या सगळ्यांची एकूण स्पष्ट माहिती येण्यास उशीर होऊ शकतो, असेही आयोगाने सांगितले.

महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांची टक्केवारी

राज्यातील ८ मतदारसंघांमध्ये वर्ध्यात सर्वाधिक ५६.६६ टक्के तर अकोला मतदारसंघात सर्वात कमी ५२.४९ टक्के एवढे मतदान झाले. तर बुलढाणा- ५२.८८ टक्के, अमरावती- ५४.५०, यवतमाळ-वाशिम- ५४.०४, हिंगोली- ५२.०३, नांदेड- ५३.५३ आणि परभणी लोकसभा मतदारसंघात ५३.७९ टक्के मतदान झाले. दरम्यान, या आठ जागांवर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मधील मतदानाची टक्केवारी पाहिली तर बुलढाण्यात ६३.६ टक्के, अकोल्यात ६०.०६ टक्के, अमरावतीमध्ये ६०.७६ टक्के, वर्ध्यामध्ये ६१.५३ टक्के, यवतमाळ- वाशीममध्ये ६१.३१ टक्के मतदान झाले होते. तर हिंगोलीत ६६.८४ टक्के, नांदेडमध्ये ६५.६९ टक्के आणि परभणीत ६३.१२ टक्के मतदान झाले होते.

विविध राज्यांमध्ये पार पडलेल्या मतदानाची टक्केवारी

महाराष्ट्र – 53.71 %
केरळ – 64.99%
कर्नाटक – 64.51%
बिहार – 53.60%
राजस्थान – 59.92 %
उत्तरप्रदेश – 53.02 %
मध्य प्रदेश – 55.23 %
आसाम – 70.68 %
छत्तीसगड – 72.51%
पश्चिम बंगाल – 71.84%
मणिपूर – 76.46 %
त्रिपुरा – 77.97%
जम्मू-काश्मिर – 67.22%

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT