नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची लैंगिक छळाच्या आरोपांची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी (२६ एप्रिल) फेटाळली. याचिकेमध्ये बृजभूषण सिंह यांनी लैंगिक छळाच्या आरोपांची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली होती. न्यायालय आता ७ मे रोजी आरोप निश्चित करणार आहे.
याचिकेमध्ये बृजभूषण सिंह यांनी दावा केला होता की, '७ सप्टेंबर २०२२ रोजी घटनेच्या दिवशी ते दिल्लीत नव्हते, त्यामुळे या आरोपांची पुन्हा चौकशी झाली पाहिजे. तसेच आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंच्या सीडीआरची (कॉल डिटेल रिपोर्ट) प्रतही द्यावी.' अशी मागणीही त्यांनी केली होती. दिल्ली पोलिसांनी जून २०२३ मध्ये बृजभूषण यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रानुसार, बृजभूषण यांनी भारतीय कुस्तीपटू संघाच्या दिल्ली कार्यालयात एका महिला कुस्तीपटूचा विनयभंग केला होता. या आरोपांची पुन्हा चौकशी करण्याची बृजभूषण सिंह यांची याचिका फेटाळण्यात आली.
दरम्यान १८ जानेवारी २०२३ रोजी, कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह ३० हून अधिक कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण प्रकरणाच्या संदर्भात दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन केले होते. क्रीडा मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर कुस्तीपटूंनी आपला विरोध संपवला. याप्रकरणी चौकशी समितीही स्थापन करण्यात आली होती. तथापि, एप्रिल २०२३ मध्ये कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा विरोध सुरू केल्यानंतर या प्रकरणाला वेग आला. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी कुस्तीपटू न्यायालयात पोहोचले होते. न्यायालयाच्या आदेशानुसारच दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता.
हेही वाचा :