Latest

ऑनलाईन शिक्षण : लिहायचंय भरपूर; मात्र लिहिता येईना

अमृता चौगुले

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला असून ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हातात पेन जाऊन मोबाईल आला आहे. त्यामुळे त्यांचा लेखनाचा सराव नसल्याने त्यांची गत 'लिहायचंय भरपूर, मात्र लिहिता येईना' अशी गत झाली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 22 महिन्यांपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या. याकाळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाच्या आदेशावरून ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मुळाशी जोडून ठेवण्याचे कार्य केले गेले. परंतु, या ऑनलाईन शिक्षणाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी ग्रामीण भागामध्ये अनेक अडचणी उभ्या राहिल्या. ग्रामीण भागातील 70 टक्के विद्यार्थ्यांकडे वेगवेगळ्या अडचणींमुळे ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही. यामध्ये कोणाकडे मोबाईल नाही, तर कोणाच्या गावात मोबाईलची रेंज नसणे आदी अनेक कारणांमुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. केवळ तीन टक्के मुलांनाच शिक्षणाचा फायदा झाला.

ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव बंद पडला. त्यामुळे त्यांच्या हातातील पेन जाऊन मोबाईल आल्यामुळे त्यांची परीक्षेच्या काळात अडचण निर्माण होत आहे. राज्य शासनाने मुलांना लेखनाविषयी सरावाच्या चाचण्या घेणे गरचेचे होते, मात्र तसे न झाल्याने विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेत तारांबळ उडत आहे. दहावीची परीक्षा देणार्‍या मुलांना आधी नववीचा पूर्ण अभ्यास असणे गरजेचे आहे. मात्र, नववीचे वर्षही कोरोनात गेल्याने त्यांचा प्राथमिक बेस अपूर्ण झाला. त्यामुळे थेट दहावीची परीक्षा देणे विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरत आहे. दहावीच्या वर्षीसुद्धा पूर्णवेळ शाळा सुरू राहू शकल्या नाहीत. या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या लेखन सरावावर झाला. याचा विचार करून बोर्डाने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 40 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे व 80 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे वाढीव वेळ दिला आहे. वाढीव वेळ देऊनही विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत नाही.

ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव झाला नाही. त्यांना थेट परीक्षेला बसविल्यामुळे त्यांची अडचण होत असून, शासनाने अर्धा तास अधिकचा दिलेला वेळही त्यांना कमी पडत आहे. शासनाने विद्यार्थ्यांसाठी आधी लेखनाचा सराव करून घेणे गरजेचे होते. शिवाय विद्यार्थ्यांनीही घरात लेखन करणे गरजेचे होते.

– शहाबुद्दीन शेख, शिक्षक, सम्यक उर्दू हायस्कूल, आहेरवाडी

SCROLL FOR NEXT