Latest

लसूण लागवड किफायतशीर

अमृता चौगुले

दैनंदिन आहारात वापरल्या जाणार्‍या लसूण पिकाची लागवड करून शेतकर्‍यांना फायदा मिळवता येतो. पदार्थांना चव आणण्यासाठी लसूण जसे उपयुक्‍त आहे, त्याचप्रमाणे त्यामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. या उत्पन्‍नातून चांगले आर्थिक उत्पन्‍नही मिळत असल्याने हे पीक शेतकर्‍यांचा सखाच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही; पण याची लागवड करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

लसूण हे कंदर्प कुलातील एक मसाल्याचे पीक आहे. अन्‍नपदार्थ स्वादिष्ट होण्यासाठी दैनंदिन आहारात लसणाचा उपयोग करतात. लसणात प्रोपिल डायसल्फाईड आणि लिपीड ही द्रव्ये असतात. चटण्या, भाजी आणि लोणचे यात लसणाचा वापर केला जातो. पोटाच्या विकारावर, पचनशक्‍ती, कानदुखी, डोळ्यातील विकार, डांग्या खोकला इत्यादींवर उपचारासाठी गुणधर्मही लसणात आहेत. महाराष्ट्रात जवळजवळ 5 हजार हेक्टर जमीन या पिकाखाली असून नाशिक, पुणे, ठाणे तसेच मराठवाडा, विदर्भात लागवड केली जाते.

समशीतोष्ण हवामान लसूण लागवडीस उपयुक्‍त असते; मात्र अती उष्ण आणि अती थंड हवामान या पिकास मानवत नाही. समुद्रसपाटीपासून 1000 ते 1300 मीटर उंचीपर्यंत लसणाची लागवड करता येते. पिकाच्या वाढीच्या काळात 75 से.मी. पेक्षा जास्त पाऊस पडत असल्यास पिकांची वाढ चांगली होत नाही. याकरिता ऑक्टोबर महिन्यात केलेली लागवड अधिक उत्पादन देते. दिवसाचे 25 ते 28 अंश सेें. ग्रे. आणि रात्रीचे 10 ते 15 अंश सें. ग्रे. तापमानात गड्ड्यांची वाढ चांगली होते. मध्यम खोलीच्या भरपूर सेंद्रिय खते घातलेल्या रेती मिश्रित कसदार तणविरहित जमिनीत पीक चांगल्या प्रकारे घेता येते. हलक्या प्रकारच्या जमिनी, चिकण मातीच्या जमिनी लागवडीस योग्य नसतात. लसणाची लागवड करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. याची पूर्वमशागत कशी करावी, हे आधी जाणून घेणे आवश्यक आहे.

मध्यम खोलीची नांगरट करून ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमीन तयार करतेवेळी हेक्टरी 30 गाड्या (14 टन) शेणखत मिसळावे. वर पाणी देण्यास सोयीस्कर अशा आकाराचे अथवा सपाट वाफे तयार करावेत. लसणाच्या विविध जाती आहेत. महाराष्ट्रात पांढर्‍या रंगाच्या जामनगर जातीची तसेच गोदावरी, श्‍वेता या जातींची लागवड केली जाते. लसणाची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात साध्या वाफ्यावर कोरड्या 107.5 सें.मी. वर करतात. गड्डे फोडून पाकळ्या किंवा काड्या सुट्या टाकून मातीत झाकतात. यासाठी हेक्टरी 500 ते 600 किलो बियाणे लागते. लागण झाल्यानंतर काड्या निघणार नाही, असे पाणी द्यावे.

याच्या बियाणांची निवडही योग्य पद्धतीने करावी लागते. लसणाच्या गाठ्या एकावर एक अशा गोलाकार पाकळ्यांनी बनलेल्या असतात. गाठ्यातील पाकळ्या सुट्या करण्याचे गड्डे पायाखाली तुडवून साफ केले जातात. लागवडीसाठी मोठ्या, निरोगी आणि परिपक्‍व पाकळ्यांचा उपयोग करावा.

याचबरोबर यासाठी कोणत्या खतांचा वापर करावा, हेही पाहण्यासारखे आहे. लावणीच्या वेळी लसणास हेक्टरी 50 किलो युरिया, 300 किलो सुुपर फॉस्फेट आणि 100 किलो म्युरेट ऑफ पोटॅश मिसळून घ्यावा. म्हणजे पिकांची वाढ जोमदार होते. लसणाच्या पाकळ्या लावल्यानंतर एक महिन्याने खुरपणी करून गवत काढून घ्यावे. त्यानंतर तण पाहून 1-2 वेळा निंदणी करावी. लागवडीनंतर अडीच महिन्यांनी लसणाचे गाठे धरण्यास सुरुवात होते. यावेळी हात कोळपणी करून माती चांगली मोकळी ठेवावी. म्हणजे मोठ्या आकाराचे आणि चांगले भरदार गाठे धरण्यास मदत होते. त्यानंतर खुरपणी अथवा कोळपणी करू नये.

लावणीनंतर पाण्याची पहिली पाळी सावकाश द्यावी. दुसरी पाळी त्यानंतर 3-4 दिवसांनी आणि पुढच्या हवामानानुसार 8-12 दिवसांनी द्याव्यात. गड्डे पक्के होताना वर पाण्याच्या दोन पाळींतील अंतर वाढवावे. काढणीच्या दोन दिवस अगोदर पाणी द्यावे. त्यानंतर वरपाणी देऊ नये. म्हणजे गड्डे काढणे सोपे जाते आणि गड्डे फुटले जात नाहीत.

लावणीनंतर साडेचार ते पाच महिन्यांनी हे पीक काढणीस योग्य होते. पाती पिवळी पडावयास लागली म्हणजे गाठे काढावयास तयार झाले असे समजावे. लसूण पातीसह तसाच बांधून ठेवावा. म्हणजे 8-10 महिने टिकतो. विक्रीसाठी पाती कापून गड्डे स्वच्छ करून आकाराप्रमाणे प्रतवारी करून बाजारात पाठवतात. जमिनीचे पोत, खते आणि जात यावर लसणाचे उत्पादन अवलंबून असते. हेक्टरी 9-10 टन उत्पादन मिळते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT