Latest

लसीकरण मोहिमेंतर्गत आता १२ वर्षांवरील मुलांनाही लस देण्यात येणार

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आता 12 वर्षांवरील मुलांनाही लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून 'झायकोव्ह-डी' लसीचे एक कोटी डोस खरेदी केले जाणार आहेत. अहमदाबाद येथील झायडस कॅडिला या उत्पादक कंपनीला केंद्र सरकारने तशी 'ऑर्डर' दिली आहे.

चालू महिन्यातच राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत 'झायकोव्ह-डी'चा समावेश केला जाईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी रविवारी दिली. 'झायकोव्ह-डी' ही जगातील पहिलीच डीएनए आधारित कोरोना प्रतिबंधक लस आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तिला हिरवा झेंडा दिला आहे.

बारा वर्षांची मुले व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी भारताच्या औषध नियामकाने मंजूर केलेली ही पहिलीच लस आहे. या लसीच्या एका डोसची किंमत कर वगळता व 'जेट अ‍ॅप्लिकेटर'चे 93 रुपये धरून 358 रुपये आहे. कंपनीच्या मर्यादित उत्पादन क्षमतेमुळे सुरुवातीच्या टप्प्यात केवळ प्रौढांनाच ही लस दिली जाईल, अशी शक्यता आहे.

लसीचे 3 डोस घ्यावयाचे असून, ते 28 दिवसांच्या अंतराने दिले जातील. या लसीत सुई (इंजेक्शन) वापरली जात नाही. त्याऐवजी 'जेट अ‍ॅप्लिकेटर' वापरले जाते. लसीला 20 ऑगस्ट रोजी औषध नियामकाकडून आपत्कालीन वापराची मान्यता मिळाली होती.

SCROLL FOR NEXT