Latest

लवंगी मिरची : विरणारे सूर, उरणारा सूर

Arun Patil

बघता बघता लताबाईंना जाऊन बरेच दिवस लोटले. त्यांच्या जाण्याने अनेक लेखण्यांना शब्द फुटले, अनेकांनी त्या निमित्ताने आपापली (नसलेली) जाणकारी जाहीर केली, अनेक कंठांना सूर सापडले. कोणी म्हणालं, माँ सरस्वती गेली. कोणी म्हणालं, भारतीय संगीताचा आत्मा हरपला. असंख्य माणसांनी अंत्यदर्शन घेतलं, तरीही कोणी म्हणालं, 'अमका का नाही आला लताबाईंना मानवंदना द्यायला?' तर, दुसरं कोणी म्हणालं, 'तमका हजर तर राहिला; पण त्याने उगाच वेगळ्या धर्माच्या पद्धतीने निरोप का दिला?'

एक सरकार म्हणालं, 'आम्ही राष्ट्रीय दुखवटा आणि सुट्टी जाहीर करू', तर लगेच दुसरं सरकार म्हणालं, 'नुसत्या सुट्टीने काय होणार आहे? आम्ही पंधरा दिवस सर्व सार्वजनिक ठिकाणी त्यांची गाणी वाजवू.' एक नेता म्हणाला, 'त्यांचं भव्यात भव्य स्मारक आमच्या राज्यातर्फे व्हावं, असं मानणार्‍यांपैकी मी एक आहे.' लगेच दुसरा नेता म्हणाला, 'बाई देशभराच्या होत्या, तेव्हा त्यांचं चिरस्मरण केंद्राने करणंच उचित ठरेल.' स्मरण जागवायचं म्हटल्याबरोबर कुठे? कसं? हे मुद्दे चघळायला निर्माण झालेच. कोणी म्हणालं, 'शिवाजी पार्कसारखी जागा दुसरी नाही.' यावर दुसरे लगेच म्हणाले, 'शिवतीर्थाचं शवतीर्थ करू नका हो! आता एकेकजण जाणारच! शिवाजी पार्कची जागा किती अडवाल? (असं ते अर्थात मनातल्या मनात म्हणाले!)' कोणाला सरकारी आदेशातली भाषा खटकली. त्यात म्हणे, 'कु. लता मंगेशकर कालवश झाल्या' असं लिहिलं गेलंय, तर कोणाला दुसर्‍याच्या शोकसंदेशाची भाषा खटकली.

एका वाहिनीवर निवेदिकेने अंत्यविधीच्या प्रक्षेपणात कोणातरी मान्यवरांना 'आणखी किस्से सांगा' अशी लडिवाळ गळ घातली. (तिला किस्से गोळा करण्याचाच पगार मिळत असेल, तर ती तरी काय करणार बिचारी?) पण, त्या किस्स्यांचा घुस्सा काहींना गप्प बसू देई ना! 'मरणाच्या संदर्भात बोलताना किस्स्यांचं काय प्रयोजन मेल्यांनो?' असं न मेलेल्यांना त्यांनी तावातावाने विचारलं. यापेक्षा अधिक गांभीर्याने बोलणार्‍यांनी विचारलं, 'त्यांनी आंबेडकरी गीतं का गायली नाहीत? किंवा सावरकरी गीतंच का गायली?' माध्यमांनी तर एकाला सोडलं नाही.

बाईंकडे पूर्वी नोकरी केलेल्या ड्रायव्हरची नात, त्यांच्या सांगलीतल्या ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वीच्या घराच्या शेजार्‍याचे आताचे भाडेकरू, मंगेशकरांकडे सध्या येणारा दूधवाला, पाववाला, त्यांच्या टी.व्ही.च्या अँटेनावर बसणारं पाखरू, त्यांनी केलेल्या शेवटच्या विमान प्रवासाचा पायलट, त्यांच्या इमारतीचा लिफ्टमन वगैरेंपैकी मिळतील त्यांचे फोटो, बाईटस् दणादण वापरले गेले. लताबाईंविषयी मलाच जास्तीत जास्त माहिती आहे, मीच त्यांना सर्वात जवळचा होतो, होते असं दाखवणारे नाना स्वर, शब्द, भाव आसमंतात घुमत राहिलेत त्या दिवसापासून!

अजूनही फुटतील, घुमतील. हलके हलके विरून जातील. फार टिकावं असं काही नसेलच त्यांच्यात. 'ता' एक सूर मात्र पिढ्या न् पिढ्यांना पुरून उरेल. सदैव माणसांची सोबत करेल. जगात कितीही उलथापालथी झाल्या, तरी तो अजरामर असेल. आजूबाजूच्या कोलाहलात हळूच म्हणेल, 'मी आहे. सुखात, दुःखात, गर्दीत, एकांतात, कुठेही कसेही असलात, तरी मी आहे. जोवर मी आहे तोवर तुम्हाला काळजी कसली?'

– झटका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT