Latest

लवंगी मिरची : बाळ जातो दूरदेशा!

backup backup

'चेहरा का असा उतरलेला?'
'पोरगं चाललंय परवादिशी.'
'कुठे?'
'लांब तिकडे अमेरिकेला. शिकायला.'
'सोता हौसेनं चाललाय ना? खूप खटपट केली असेल ना त्यासाठी?'
'तर हो. सा-आठ महिने कुटाणा चाललावता ह्या जाण्याबाबत. किती कागदं, किती हेलपाटे, किती खर्च! बाबा बाबा! जीव नको केलेला त्याने बापाचा.'
'पण त्याचा सगळा जीव अमेरिकेत गुंतलाय ना?'
'तेच तर दुखतंय माज्या जिवाला! काय कमी होतं हो इथं? घरदार आहे, आयबाप आहेत, सगेसोयरे आहेत. हे समदं सोडून कुठे पळत सुटावं माणसानं?'
'तिथल्या म्होरल्या शिक्षणासाठी जातोय ना?'
'इथे निघताहेत की नवी कॉलेजं. इथवर तरी बापानंच नेटानं शिकवला ना त्याला? तरी समाधान होईना?'
'शिक्षणाला कधी माणसानं 'पुरे' म्हणूच नये मावशीबाई. मिळेल तेवढं घेवावं.'
'मागं र्‍हालेल्या घरच्यांना काय रडत ठेवावं?'
'त्यांनी तरी रडावं का म्हणतो मी? उलट खूश व्हावं. आपल्याला जमलं नाही ते पोरगा करतोय. आपण पोचलो नाही तिथे पोचतोय. आनंद आहे ना?'
'पण का हो? शेवटी आणखी दीडक्या मिळवण्यासाठीच असणार ना ही फरफट? किती झालं तरी दुसर्‍यांच्या देशात, घरात उपरेच र्‍हाणार की नाई?'
'असं पूर्वी होतं मावशीबाई, आता जग बदलत चाललंय. आता आपली भारतीय वंशाची माणसं जगभर उंचउंच झेंडे रोवताहेत.'
'छ्या! मी तर आईकलंय की ते लोक आपल्याला अन्‍नाडी समजतात. हत्तींच्या, सापांच्या, गारुड्यांच्या देशातले लोक असं हलक्या नजरेने बघतात!'
'मग त्यांनाच सोताची नजर बदलावी लागेल. आता आयर्लंडचे तरुण पंतप्रधान लियो वराडकर हे मुंबईतल्या एका डॉक्टरांचे चिरंजीव आहेत.'
'काय सांगता?'
'मग? न्यूझिलंड मंत्रिमंडळातल्या लेबर पार्टीच्या प्रियंका, बि—टनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतले ऋषी सुनाक, त्रिनिदादच्या पहिल्या महिला पंतप्रधान, अमेरिकेतल्या साऊथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष हॅरीस, फिजी बेटांमधले दोन-तीन खासदार, मंत्री हे सगळे भारतीय वंशाचे आहेत.'
'बाबो, मला तर ही नावंही माहिती नाहीत.'
'नावाचं सोडा एकवेळ, मुद्दा ध्यानी घ्या. आज जगभर राजकारणात, शिक्षणात, उद्योगधंद्यात, आपली माणसं एकदम टॉपला जाताहेत बघा.'
'ही म्हणजे गर्व करायचीच बाब झाली की.'
'पण तुम्ही तर दुःख करताय मुलगा अमेरिकेला निघाला म्हणून.''काळजाला घोर लागतोच ना शेवटी? पूर्वीच्या कवितेत म्हटलंय तसं, 'बाळ जातो दूरदेशा, मन गेले वेडावून, आज सकाळपासून.'
'ती कविता आम्हालाही होती. आवडायची पण खूप. मातेच्या मनाचं हळवेपण दाखवलेलं असायचं ना? पण आता आयबापांनी असला हळवेपणा ठेवायला नको. पोरांना उमेदीने जगभर धाडावं आणि छानपैकी झेंडा फडकवून यायला सांगावं.'
'बघते जमतं का तसं करायला?'

– झटका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT