Latest

लवंगी मिरची : खिचडीचं शास्त्र

Arun Patil

काय रे पोरा? 'अहो, रात्री जेवायला काय करू?'
'उगाच मला विचारायचं नाटक कशाला करतेस गं?'
'नाटक काय नाटक? मी मेलीनं एवढं विचारलं ते गेलंच कुठे.'
'तुझं विचारणं जाणारच होतं बाराच्या भावात. बोलताना बासुंदीपुरीपासून सुरू करशील आणि शेवटी नेहमीसारखी मुगाच्या खिचडीवर येऊन थांबशील, हे काय मला माहीत नाही?'
'मुगाची खिचडी म्हणताना एवढं काही तोंड वाकडं करायची गरज नाही बरं का. तो हार्दिक पंड्यासुद्धा रोज खिचडी खातोय म्हणे.'
'तुला हे कधी सांगितलं गं त्याने?'
' सांगायला कशाला हवं? पेपरात वाचलंय मी. तो एवढा जगभर खेळतो पठ्ठ्या; पण माणूस म्हणून फारच बाई साधा! वारेमाप हादडायला मिळतंय म्हणून उगाच बाहेरचं खात नाही तो. आपली घरगुती, सात्त्विक मुगाची खिचडीच खातो निमूटपणे. शास्त्र असतं ते!'
'त्याला बॉडी बनवायला हवीच म्हणा. त्यात थोडं फिटनेसचं फॅडही असेल त्याचं.'
'असेलही! पण किती निष्ठेने करतोय तो. खिचडी एके खिचडी. ती मिळावी म्हणून जगभरात जाईल तिथे तो आपल्या शेफलाही सोबत नेतो म्हणे. आरव नांगिया म्हणून कोणीतरी खासगी शेफ आहे त्याचा.'
'तुला हेही माहीत आहे?'
'मग? सगळ्या नसत्या उठाठेवी काय तुम्हीच कराव्यात? सध्या तो आरव त्याच्याबरोबर ऑस्ट्रेलियात एकेका स्टेडियमजवळ भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतोय म्हणे. तो मालकाला वेळच्या वेळी, सौम्य सात्त्विक खाणं नेऊन देतो म्हणे.'
'तेही खात असेल आणि हॉटेलचंही चापत असेल समोर आल्यावर.'
'ह्याला म्हणतात स्वतःवरून जगाची परीक्षा करणं. दिसेल ते खायला तो काय तुम्ही आहात? रोज 3000 कॅलरीज आणि मॅचच्या दिवशी 4000 कॅलरीज असं मोजून खातो बरं का तो.'
'खिचडी खाल्ल्यामुळे एवढं कौतुक होतं का एखाद्याचं? मग मीही खाईन. नुसती खाणार नाही, मी तर म्हणतो, मी शिकूनच घेतो ना खिचडी बनवणं.'
'अरे देवा! आता हे काय नसतं लचांड काढलंयत? आयुष्यभर एवढी आयती मिळतेय ती खायला होईना तुम्हाला? स्वतः करून काय करणार?'
'माझ्या मनात एक कल्पना आलीये. ह्या शेफला भरपूर पगारबिगार द्यावा लागत असेल पंड्याला. एकदा खिचडीवर हात बसला की, मीच जातो ना त्याच्यासोबत. पगारबिगार काही मला देऊ नकोस म्हणावं. शास्त्रानुसार खिचडी तर करून देईनच; शिवाय त्याची इतर कामंही करेन बाजूबाजूने. कपड्यांना इस्त्री म्हणा, बुटांना पॉलिश म्हणा. तेवढाच मोठमोठ्या क्रिकेटर्सना बघण्याचा, भेटण्याचा चान्स मिळणार आम्हाला. क्रिकेटसाठी कायपण करू बरंका आपण. शास्त्र असतं ते.'
तसं बघायला गेलं तर या क्रिकेटपटूंसोबत फिरायला मिळणं हा भाग्याचीच गोष्ट म्हणायची. आता पंड्याला खिचडी आवडत असेल तर ती आपण करून द्यायची. खा, पाहिजे तेवढी.
हे सगळं खरं आहे; पण त्याच्याबरोबर फिरायला मिळणं हे वाटतं तेवढं सोपं नाही हं!
हो, मलाही हे मान्य आहे; पण मुगाची खिचडी बनवणं फारसं अवघड नाही. पंड्याला ती आवडते म्हणजे बाकीच्या शाकाहारी क्रिकेटपटूंनाही आवडत असणारच.

– झटका

SCROLL FOR NEXT