Latest

लडाख ते अरुणाचल… चीन सीमेवर ‘गरुड’चा पहारा

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लडाख ते अरुणाचल प्रदेश या चीनच्या सीमेवर भारतीय हवाई दलाचे घातक 'गरुड' हे कमांडो दल तैनात करण्यात आले आहे. घुसखोरी कारवाया रोखण्याची विशेष जबाबदारी या दलाच्या निधड्या कमांडोंवर सोपवण्यात आली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हवाई दलाच्या तळांची सुरक्षा आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड या कामात स्पृहणीय कामगिरी करणार्‍या गरुड या हवाई दलाच्या कमांडो दलाकडे 2020 पासून भारत-चीन सीमेची डोळ्यात तेल घालून निगराणी करण्याची व चिनी खुसपटे हाणून पाडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लडाख ते अरुणाचल प्रदेश अशा चिनी सीमेवर गरुड कमांडो दलाचे जवान कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत.

गरुड कमांडो दलाकडे नेगेव्ह लाईट मशिनगन, गलील या स्नायपर गन्स, इस्रायली बनावटीच्या टॅव्हर गन्स आदी अत्याधुनिक हत्यारे आहेत. यातील काही बंदुका 800 ते 1 हजार मीटर अंतरावरून शत्रूचा वेध घेण्याची व त्यांना यमसदनी पाठवण्याची घातक क्षमता असलेल्या आहेत. काश्मीर खोर्‍यात रख्त हाजीन येथे एका चकमकीदरम्यान गरुड कमांडोंनी नेगेव्ह मशिनगनचा प्रथमच वापर केला होता. त्यात पाच दहशतवादी मारले गेले होते.

अत्याधुनिक शस्त्रास्त्रे

चीन सीमेवरची स्फोटक परिस्थिती पाहता या कमांडो पथकाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवण्यात आली आहेत. आतापर्यंत जगात फक्त अमेरिकन कमांडो दलांकडे असणारी सर्वात भेदक सीग सॉयर अ‍ॅसॉल्ट रायफल आता गरुड दलाच्या कमांडोंच्या हाती असणार आहे. त्या शिवाय या दलाच्या घातक हत्यारांपैकी एक असलेल्या एके 203 या रशियन बनावटीच्या अत्याधुनिक रशियन रायफली आता थेट भारतातच तयार करण्यात येणार आहेत.

SCROLL FOR NEXT