मॉस्को; वृत्तसंस्था : सौंदर्याची आस कुणाला नसते? सारे जगच सौंदर्याचे चाहते आहे. रशिया देश जगात अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. पोलादी पडद्यामागचा हा देश अनेक गुपिते बाळगून आहे. त्यातही दोन गोष्टींसाठी तो विशेष प्रसिद्ध आहे. एक म्हणजे, इथली जीवघेणी थंडी आणि दुसरी म्हणजे येथल्या सुंदर युवती. रशियन महिलांचे सौंदर्य जगात नंबर एकचे समजले जाते. त्यामुळे येथे 'वाईफ टुरिझम'साठी अन्य देशांतून येणाऱ्या पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे.
'वाईफ टुरिझम' म्हणजे अन्य देशांतील नागरिक रशियात बायको शोधण्यासाठी आवर्जून येतात. त्यात सर्वाधिक पर्यटक चीनमधले आहेत. त्याचेही कारण असे की, चीनमध्ये वन चाईल्ड पॉलिसीमुळे मुलींचे प्रमाण कमी आहे. आता लग्नाळू मुलांना तेथे मुली मिळत नाहीत. दुसरे म्हणजे, रशियात मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे व या मुली सौंदर्यवती आहेत. चिनी तरुण याबाबतीत सायबेरियातील मुलींना अधिक पसंती देतात. कारण, या भागातील मुली अधिक सुंदर असतात. रशियात 'वाईफ टुरिझम' आता व्यवसायच बनला आहे.
विवाह संस्था लग्नाळू युवकांची भेट त्यांना पसंत पडेल, अशा मुलीबरोबर घडवून आणतात. अन्य देशांतील बडे बडे उद्योजकही सुंदर पत्नीच्या शोधात रशियात येतात. त्यासाठी विवाह संस्थांची लाखो रुपयांची फी भरतात. रशियन मुली स्वदेशी जोडीदाराला अधिक प्राधान्य देत असल्या, तरी कित्येक मुलींनी रशियाबाहेरच्या मुलांशी विवाह केले आहेत. रशियन मुलीबरोबर लग्न केले तर मुलाला रशियाची कायदेशीर विवाहपद्धती स्वीकारावी लागते.